चिपळूण : शहरातील भाग येथील गोपाळकृष्णवाडी येथे आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास घराला भीषण आग लागून मंडपाच्या साहित्यासह लाखो रुपयांचे नुकसान झाले. नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.पाग गोपाळकृष्णवाडी येथील मुंबई स्थित असलेल्या अरुण भालेकर यांच्या भीमाशेठ निवासस्थानात त्यांचे नातेवाईक असलेले पाच कुटुंबीय राहत होते. वसंत भोजने, पांडुरंग भोजने, शशिकांत भोजने, निलेश भोजने व विजय भोजने असे पाच जण या निवासस्थानी चार वर्षांपासून राहतात.आज, शुक्रवारी सकाळी घरातील सर्वजण कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान भोजने यांच्या आई एकट्याच घरी होत्या. यावेळी अचानक शॉर्टसर्किटने घराला आग लागली. लाग लागल्याचे लक्षात येताच शेजाऱ्यांनी धाव घेत त्यांच्या आईस घराबाहेर काढले. त्यानंतर काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि एका रूममधील सिलेंडरचा स्फोट झाला. या भीषण आगीत संपूर्ण घर भस्मसात झाले. यावेळी नगर परिषद अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहचून आग नियंत्रणात आणली. या आगीत निलेश भोजने यांच्या मंडपाच्या साहित्याचे व घरातील कपडे व अन्य साहित्य जळून खाक झाले.
चिपळुणात घराला भीषण आग, लाखोंचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 1:28 PM