लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवीत कोट्यवधींची गुंतवणूक करून घेत लाखो गुंतवणूकदारांना ठेंगा दाखविणाऱ्या मल्टिस्टेट कंपनीची दखल स्थानिक पोलीस यंत्रणेने घेतली आहे. रत्नागिरी, तसेच चिपळूण पोलिसांनी याबाबत कालिकाई संपर्क सेवा समितीचे सचिव राजेश सावंत यांच्याकडून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. या मल्टिस्टेट कंपनीचे मास्टरमाइंड चिपळूण आणि खेड तालुक्यातील असल्याने खळबळ उडाली आहे.
मल्टिस्टेट कंपनीच्या सूत्रधारांनी थेट ठाणे येथे मल्टिस्टेट कंपनीची स्थापना करून त्याला प्रथम एका प्रसिद्ध देवीचे नाव दिले. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील एका कृषिजन्य विभागाचे नाव देऊन वर्गीकरण करण्यात आले. त्यामुळे लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला. हजारो नव्हे, तर लाखो लोकांनी या मल्टिस्टेट कंपनीमध्ये गुंतवणूक केली. ठाणे येथे मुख्य कार्यालय, तर वडाळा येथे काॅर्पोरेट कार्यालय थाटून कंपनीचा भपकेदार कारभार सुरू करण्यात आला होता. सुरुवातीला काही काळ गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे पैसे मिळाले, नंतर मात्र मास्टरमाइंड असलेले सूत्रधार एकेक करून गायब झाले आणि लाखो गुंतवणूकदारांनी डोक्याला हात लावला.
गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी कालिकाई संपर्क सेवा समितीची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून थेट आर्थिक गुन्हे शाखा मुंबई येथे तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीची दखल घेत हे प्रकरण चौकशीसाठी पोलीस उपायुक्तांकडे पाठविण्यात आले; परंतु मल्टिस्टेट कंपनीचे मुख्य कार्यालय ठाणे येथे असल्याने आर्थिक गुन्हे शाखेनेच या प्रकरणाची चौकशी करावी, अशी कालिकाई संपर्क सेवा समितीची मागणी आहे. त्याला अद्याप यश आलेले नसल्याने संपर्क सेवा समितीने आता थेट गृहमंत्र्यांची भेट आणि आझाद मैदानात धरणे आंदोलनाची भूमिका घेतली आहे.