चिपळूण : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि कोविड सेंटरमध्ये निर्माण होणारी औषध व उपचार साहित्य तुटवडा याचा विचार करून आमदार शेखर निकम यांनी आपल्या निधीतील सुमारे ६५ लाखांचे साहित्य व औषधे चिपळूण आणि देवरुख येथील शासकीय रुग्णालयाला दिल्याने वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांना सेवा देण्यास बळ प्राप्त झाले आहे.
कामथे आणि देवरुख या ठिकाणी असणाऱ्या सरकारी आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. एकाबाजूला वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची कमतरता, तर दुसऱ्या बाजूला आवश्यक असणारी यंत्रणा आणि औषधांचा तुटवडा आशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणा काम करत आहे. शेकडो कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन आपल्या घराकडे परतत आहेत. मात्र, आरोग्य यंत्रणा हतबल होत चालली असताना या यंत्रणेला ताकद देण्याचे काम आमदार निकम यांनी केले आहे.
आमदार स्थानिक निधीतून निकम यांनी कामथे रुग्णालयाला चार मॉनिटर ऑक्सिजन मीटर, ऑक्सिजन रिसिव्हर बॅग, ऑक्सिजन बॉटल औषधे असे सुमारे पंचवीस लाखांचे साहित्य खरेदी करून दिले आहे. देवरुख येथे नव्याने निर्माण केलेल्या कोविड सेंटरला बेड, पीपीई किट, रेफ्रिजरेटर, ऑक्सिजन बॉटल असे सुमारे चाळीस लाखांचे साहित्य दिले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण आमदार निकम यांनी दूर केला आहे.