राजापूर : गणित ही दैनंदिन व्यवहाराशी निगडित भाषा आहे. त्यामुळे गणित हा विषय समजून घेतल्यास तो सर्वात सोपा विषय आहे. गणिताविषयी मुलांमध्ये अनामिक भीती असते. ही भीती घालवून गणित विषय सोपा करण्यासाठी ‘अबॅकस’ गणिती पद्धतीचा चांगला हातभार लागू शकेल, असे मत येथील राजापूर हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका मानसी हजेरी यांनी येथे केले.
चाणक्य प्रोॲक्टिव्ह अबॅकस राजापूर सेंटरच्या वतीने शिशुविहार सभागृहात सहा दिवस मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी भगिनी मंडळ राजापूरच्या अध्यक्षा डॉ. गायत्री कोळेकर, शिशुविहारच्या ललिता भावे, विद्याधर पंडित उपस्थित होते. या कार्यशाळेत सहभागी मुलांना अबॅकस गणिती पद्धतीविषयी माहिती देण्यात आली. या अनुषंगाने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यातील विजेत्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. अबॅकस राजापूरच्या संचालिका श्रीया शशांक भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.