रत्नागिरी : कोरोना संसर्ग वाढू लागल्याने आता गेल्या वर्षाची पुनरावृत्ती होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या मे महिन्यात मुंबईहून येणाऱ्यांमुळे कोरोना रुग्णांची संख्या अधिकच वाढू लागली होती. मात्र, अनेक गावांनी गेल्या वर्षी गावी आलेल्या मुंबईकरांचे गावातच विलगीकरण करून कोरोनाला वेशीवरच रोखले होते. त्यामुळे यावर्षी जिल्हावासीयांनी मे महिन्यात कोरोनाविषयक खबरदारी घेतली तर कोरोनाला नक्की रोखता येणार आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर गावी आलेल्या मुंबईकरांकडून संसर्ग वाढला. जून महिन्यात तो स्थानिक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर फैलावला. त्यानंतर पुन्हा गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकर गावी आल्याने संसर्ग वाढला. त्यामुळे मे ते सप्टेंबर या पाच महिन्यांच्या कालावधीत कोरोना रुग्णांची संख्या साडेसात हजारांवर पोहोचली होती.
यावर्षी मुंबई कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाले आहे. त्यामुळे तिथून गावी येणाऱ्यांकडून संसर्ग वाढत आहे. यापुढे ही संख्या वाढणार आहे. मात्र, यावर खबरदारीची उपाययोजना म्हणून ग्राम कृती दलाने बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना गेल्या वर्षीप्रमाणे विलगीकरणात ठेवायला हवे. प्रत्येक गावामध्ये अशी सोय करून दिल्यास गावांमध्ये होणारा संसर्ग थोपविता येणार आहे.
गेल्या वर्षीच्या मे महिन्याची कोरोना रुग्णसंख्येची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्ह्यातील गावांनी मुंबईवरून येणाऱ्या गावकऱ्यांना विरोध करण्याऐवजी गावातील शाळांमध्ये त्यांच्या अलगीकरणाची सुविधा उपलब्ध करून सोय केल्यास गावातील इतर नागरिकांना संसर्ग होण्याचा धोका टळणार आहे. त्यामुळे आता गावांमधील ग्राम कृती दलांनी सक्रिय राहण्याची गरज आहे.
मुंबईत दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने मुंबईकरांना अधिक अडचणी येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या भीतीने जिल्ह्यातील काही गावांमध्ये मुंबईतून चाकरमानी गावी येण्यास आता हळूहळू सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यापुढे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन गावागावांमधून सतर्कता राखून योग्य ती खबरदारी घेतल्यास जिल्हा प्रशासनाला कोरोनाला थोपविण्यात यश येईल.
केवळ एप्रिल महिना पूर्ण होण्याआधीच या एका महिन्यात सुमारे १० हजार रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरातील कोरोना रूग्णांची संख्या केवळ या महिन्यातच झाली आहे. सध्या आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आहे. त्यामुळे निदान प्रत्येक व्यक्तीने आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनापासून मुक्त राहण्यासाठी योग्य खबरदारी घेतली आणि सामाजिक अंतर राखले तरी कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात नक्कीच येईल.
डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी