चिपळूण : सभागृहात बहुमताने मुदतवाढ दिलेली ३७ कामे नगराध्यक्षांनी अहंकार आणि राजकीय स्वार्थापायी अडवून ठेवली. त्या जनतेला वेठीस धरत आहेत, असा थेट आरोप महाविकास आघाडीने बुधवारी पत्रकार परिषदेत केला. शहर विकासासाठी आम्ही दोन पावले पुढे आलो आहोत. त्यांनी किमान एक पाऊल तरी पुढे यावे, असे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले.
उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेला बांधकाम सभापती मनोज शिंदे, आरोग्य सभापती शशिकांत मोदी, नगरसेवक कबीर काद्री, नगरसेविका संगीता रानडे, सई चव्हाण, जयश्री चितळे, सुरय्या फकीर उपस्थित होते. यावेळी शशिकांत मोदी म्हणाले की, कोरोनामुळे ठप्प पडलेल्या ४८ विकास कामांना मुदतवाढ देण्याचा विषय २६ फेब्रुवारी २०२० च्या सभेत चर्चेला आला, तेव्हा ज्या कामाबद्दल तक्रारी आहेत किंवा वाद आहेत अशी कामे वगळून अन्य कामांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीने केली. त्यावेळी वादग्रस्त आणि तक्रार झालेली अशी ११ कामे प्रशासनाने बाजूला करून ३७ कामे मुदतवाढीसाठी सभागृहात ठेवली असता महाविकास आघाडीने सर्व ३७ कामांना मुदतवाढ देण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला. ठराव मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने आम्ही पाठपुरावा सुरू केला. मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांची वेळोवेळी भेट घेतली. मुदतवाढ दिलेली कामे अजूनही सुरू केलेली नाहीत, असा आरोप मोदी यांनी केला.
सुधीर शिंदे म्हणाले की, वेगवेगळी कारणे पुढे करून विकास कामांना अडवून ठेवणे ही नगराध्यक्षांची जुनी सवय आहे. स्वतःच त्रुटी काढायच्या, मंजूर कामामध्ये चुकीचे मुद्दे टाकायचे आणि मग ती कामे महाविकास आघाडीमुळे रखडली आहेत, असे जनतेसमोर आणायचे व महाविकास आघाडीची बदनामी करायची असे त्यांचे राजकारण सुरू आहे. मी सांगेन तेच धोरण आणि मी बांधेन तेच तोरण असा त्यांचा स्वभाव असून त्यांच्या या स्वभावामुळेच शहर विकासाला खो बसला आहे. पण आता आम्ही शांत बसणार नाही. येत्या शुक्रवारी प्रत्येक प्रभागातील नागरिकांना जमा करून नगराध्यक्ष नागरिकांची कशी दिशाभूल करताहेत आणि कशी जाणूनबुजून त्यांनी कामे अडवून ठेवली आहेत, ते निदर्शनास आणून देणार आहोत, असे स्पष्ट केले.
..........................
सांस्कृतिक केंद्राबाबत सकारात्मकच
सांस्कृतिक केंद्र सुरू व्हावे यासाठी महाविकास आघाडीने सुरुवातीपासूनच आग्रही भूमिका घेतली आहे. पालकमंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत या आमच्या नेत्यांनी त्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. परंतु केंद्र लवकर सुरू व्हावे ही नगराध्यक्ष आणि प्रशासनाची मानसिकता नसल्याने केंद्र रखडून पडले आहे, असा गंभीर आरोप मोदी यांनी केला.