रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत सभापती देवयानी झापडेकर यांनी जिल्हा आरोग्य विभाग आणि हिवताप विभागाला दिलेल्या निर्देशानुसार या दोन्ही विभागांच्या संयुक्त विद्यमाने सर्व ग्रामपंचायतींना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.जिल्ह्यात डेंग्यूचे रूग्ण आढळल्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ए. ए. आठल्ये आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. बी. जी. टोणपे यांनी संयुक्तपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतचे पत्र काढले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांनाही पत्र धाडण्यात आले आहे. आरोग्य विभाग आणि हिवताप विभागाकडून जिल्हाभरात कीटकजन्य रोगांच्या साथीपासून रक्षण करण्याची उपाययोजना सुरूच असते. ग्रामपंचायतींनीही आपल्या स्तरावर पुढाकार घेऊन कीटकजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत, हा या पत्रामागचा उद्देश आहे.कीटकजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी डासोत्पत्तीची ठिकाणे नष्ट करून येथे गप्पी मासे सोडावेत. पाणीसाठवण भांडी स्वच्छ करून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. गावातील शौचालयांच्या व्हेंट पाईपला जाळी बांधावी, टायर, भंगार साहित्य साफ करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.शहरी भागातील तुंबलेली गटारे साफ करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. ग्राम आरोग्य पाणी पुरवठा व पोषण समितीच्या सभेत याबाबत गावात जनजागृती करण्याची सूचनाही आरोग्य विभागातर्फे करण्यात आली आहे. या सर्व उपाययोजना जिल्हाभरात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून राबवल्या जात आहेत. त्यासाठी गावसहभाग तितकाच महत्वपूर्ण असल्याने विशेषत्त्वाने कीटकजन्य रोगांना रोखण्यासाठी या उपाययोजना करण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. अनंत शिरूरे, एस. बी. सट्ये, एस. ए. जोशी, ए. आर. तटकरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
कीटकजन्य आजार रोखण्यासाठी उपाय
By admin | Published: October 06, 2016 10:06 PM