चिपळूण : गुहागर-विजापूर मार्गावरील कुंभार्ली घाटात काही दिवसांपूर्वी कार दरीत कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घाटात वारंवार अपघात हाेत असून, हा घाट धोकादायक बनलेला असल्याने या घाटाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यात याव्यात, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडून शासनाचे लक्ष वेधले आहे.आमदार निकम म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा गुहागर- विजापूर मार्गावरील कुंभार्ली घाट महत्त्वाचा आहे. मात्र, हा घाट अतिशय धोकादायक बनलेला आहे. काही दिवसांपूर्वी कुंभार्ली घाटातील दरीत कार काेसळून दोघांचा मृत्यू झाला. दोन दिवस थांगपत्ता लागला नाही. अखेर येथील ग्रामस्थ व पोलिसांच्या सहकार्याने या दोघांचा शोध लागला. ही घटना पाहता या घाटाची अवस्था लक्षात येईल. त्यामुळे या घाटात उत्तम दर्जाचे संरक्षण कठडे उभारणे गरजेचे आहे. याचबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाययोजना आखण्याची आवश्यकता आहे, असे निकम यांनी सांगितले.
- मुंबई- गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत सातत्याने आवाज उठवण्यात आला आहे. पुढील काळात तरी या मार्गाच्या पूर्णत्वाकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.
- चिपळूण रेल्वे स्थानकानजीक कळंबस्ते येथे रेल्वे फाटक आहे. येथे ओव्हर ब्रिज बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. गेल्या काही दिवसात फाटक न पडण्याची घटना घडली आहे. सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही. तरी कळंबस्ते फाटक येथे ओव्हर ब्रिज बांधण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध व्हावा.