लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. दरडीच्या बाजूने जर खोदाई करून पाणी वाहून जाईल, अशी व्यवस्था केली जात आहे. मात्र, या घाटातील चौपदरीकरणाचे काम थांबल्याने तूर्तास दरडीचा धोका कायम आहे.
मुंबई-गोवा रस्त्यावरील खड्डय़ांबाबत व पावसाळ्यातील उपाययोजनांविषयी आढावा घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या विनायक राऊत यांनी चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांची कानउघाडणी केली होती. त्यावर कशेडी ते लोटे आणि चिपळूण ते आरवलीदरम्यानच्या महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम आठवडाभरात सुरू करण्यात येईल, असे ठेकेदारांनी कबूल केले होते. तूर्तास खेड हद्दीत पॅचवर्कचे काम सुरू झाले आहे. मात्र, चिपळूण हद्दीत परशुराम घाट व कामथे, सावर्डे विभागात डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे यावर्षीही पावसाळ्यात खड्ड्यांची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच आता परशुराम घाटात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर काही उपाययोजना सुरू केल्या आहेत. या घाटातील चौपदरीकरणाचे काम जागेच्या मोबदल्यामुळे ठप्प आहे. ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर थांबलेले काम आजतागायत सुरू झालेले नाही. त्यामुळे या घाटात पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी चरखोदाई व अन्य उपाययोजना केल्या जात आहेत.
----------------
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.