रत्नागिरी : बहुचर्चित शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयाच्या पहिल्या शैक्षणिक वर्षाला बुधवारपासून शहरानजीकच्या उद्यमनगर भागातील शासकीय महिला रुग्णालयाच्या प्रशस्त इमारतीत प्रारंभ झाला. राज्यभरातूनच नव्हे तर अगदी देशातील काही भागातून या महाविद्यालयात विद्यार्थी येणार असून पाच वर्षात रत्नागिरीच्या या महाविद्यालयातून डाॅक्टर्स तयार होऊन बाहेर पडणार आहेत. सध्या इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या १० - १२ दिवसांत काम पूर्णत्वाला जाईल, असा विश्वास या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. जयप्रकाश रामानंद यांनी व्यक्त केला.रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. १०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या या महाविद्यालयात ८५ जागा राज्यासाठी आणि १५ जागा देशातील विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. १०० पैकी ५४ जागा मुलांसाठी आणि ४८ जागा मुलींसाठी आहेत. या इमारतीचा कायापालट होऊ लागला असून प्रशस्त विविध वर्ग, विविध लॅब, कँटिन, अभ्यासिका या इमारतीत तयार करण्यात आल्या आहेत. या महाविद्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनाची तारीख अद्याप निश्चित नसली तरी या महाविद्यालयाचे उर्वरित बांधकाम येत्या दहा दिवसांत नक्कीच होईल, असा विश्वास डाॅ. रामानंद यांनी व्यक्त केला.
बुधवारी पहिल्या दिवशी ही मुले डाॅक्टरांच्या ॲप्रनमध्ये महाविद्यालयात दाखल झाली. त्यांच्यासोबत त्यांचे पालकही होते. त्यामुळे महाविद्यालयाचा परिसर गजबजून गेला होता.पहिल्याच दिवशी अधिष्ठाता डाॅ. जयप्रकाश रामानंद यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गुरुवारपासून सकाळी ९ ते ५ या वेळेत या महाविद्यालयाचा नियमित अभ्यासक्रम सुरू होणार आहे. सध्या या आवारात या मुलांसाठी तात्पुरती कँटिनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या महाविद्यालयासाठी ४० अधिव्याख्यात्या डाॅक्टरांची आवश्यकता आहे. सध्या १३ डाॅक्टर्स हजर झाले आहेत. उर्वरितही लवकरच हजर होतील. तसेच प्रवेश झालेले विद्यार्थीही आता लवकरच हजर होतील, असेही डाॅ. रामानंद यांनी सांगितले.
वसतिगृहाची सुविधाशहरातील बोर्डिंग रोड येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही इमारत तीन वर्षांसाठी भाडेकराराने घेण्यात आली आहे. त्यानंतर हे वसतिगृह वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या इमारतींमध्ये सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या निवासाचीही समस्या राहणार नाही.
प्रवेश सुरुवैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रवेश देताना ते गुणवत्तेनुसार दिले गेले आहेत. आतापर्यंत झालेल्या प्रवेशांमध्ये मुंबईच्या दहा विद्यार्थ्यांचा समावेश असून रत्नागिरीचे चार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.