दापाेली : सध्याच्या जंक फूडच्या जमान्यात आपल्या आहारात भाज्यांचा वापर मर्यादित स्वरुपातच केला जातो. त्यात रानभाज्यांचा वापर तर क्वचितच केला जातो. कोकणात सुमारे १००-१५० प्रकारच्या रानभाज्या पावसाळी हंगामात आढळतात. या भाज्यांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. रानभाज्यांचा आपल्या आहारात जास्तीत-जास्त वापर आणि त्याचबरोबर त्यांचे संवर्धन यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे, असे उद्गार डॉ. पूजा सावंत यांनी सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना काढले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठअंतर्गत, कृषी महाविद्यालय दापोलीमधील कांचन गेंड व नम्रता कडव यांनी ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम आणि एकता शेतकरी उत्पादक गट, गव्हे यांच्या संयुक्त विद्यमाने गव्हे - ब्राह्मणवाडी ‘रानभाज्या पाककृती स्पर्धेचे’ आयोजन केले होते. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बाेलत हाेत्या. कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम महाडकर, तसेच विस्तार शिक्षण विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. हेमंत बोराटे तसेच कृषी अर्थशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विजयकुमार थोरात आणि सहायक प्राध्यापक डॉ. दीपक मळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या डॉ. पूजा सावंत, एकता शेतकरी उत्पादक गट अध्यक्ष संजय हरावडे, तसेच माजी अध्यक्ष अनंत आंबेकर, महिला बचत गट अध्यक्ष भागीरथी म्हाब्दी व आदर्श शेतकरी सुधाकर मोरे यांच्याहस्ते करण्यात आले. या रानभाज्या पाककृती स्पर्धेत २६ प्रकारच्या रानभाज्यांचे नमुने मांडण्यात आले होते. डॉ. पूजा सावंत यांनी सर्व रानभाज्यांच्या नमुन्याचे परीक्षण करून पहिल्या तीन क्रमांकांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक केले. तसेच सहभागी झालेल्या महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमात एकूण २५-३० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता कडव आणि कांचन गेंड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळ गव्हे, ब्राह्मणवाडी तसेच समाजमंदिर, गव्हे ब्राह्मणवाडी यांची मदत झाली. तसेच विस्तार शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या रानभाज्यांची माहिती देणारे तक्ते शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरले. जान्हवी आंबेकर यांनी आभार मानले.