चिपळूण : शहरात मारण्यात आलेल्या लाल व निळ्या रेषेविषयी येत्या आठ दिवसात बैठक घेऊन ठोस निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी सोमवारी (६ फेब्रुवारी) मुंबई येथे चिपळूण बचाव समितीसमवेत झालेल्या बैठकीत दिले. वाशिष्ठी व जगबुडी नदीतील पहिल्या टप्प्यातील गाळ नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काढण्याचा धोरणात्मक निर्णयही या बैठकीत घेतला. जगबुडीसाठी जिल्हा नियोजन समितीतून १० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री काही कामानिमित्त निघून गेल्याने पुढील निर्णय त्यांच्या सचिवांमार्फत घेण्यात आले.चिपळूण बचाव समितीचे बापू काणे, अरूण भोजने, राजेश वाजे, किशोर रेडीज, उदय ओतारी, शहानवाज शहा, महेंद्र कासेकर यांनी प्रशासनाकडून सुरू असलेला वेळकाढूपणाविराेधात २६ जानेवारीपासून पुन्हा बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर १० फेब्रुवारीपर्यंत निर्णय न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा समितीने दिला होता. त्याप्रमाणे सोमवारी मुंबईत वर्षा बंगल्यावर चिपळूण बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली.या बैठकीत झालेल्या चर्चेअंती वादग्रस्त लाल व निळ्या पूररेषे संदर्भात आपण स्वतः उपमुख्यमंत्री आणि सचिवांसोबत येत्या ८ दिवसात बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. यानंतर वाशिष्ठी नदीपात्राच्या पहिल्या टप्प्यातील संपूर्ण गाळ नाम फाउंडेशनतर्फे काढण्याचे ठरले. याशिवाय वाशिष्ठीच्या झालेल्या कामाची उलटतपासणी करून उर्वरित कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे ठरले. त्यावर येत्या अधिवेशनात निर्णय घेण्यात येईल. उक्ताड येथील एन्रॉन पुलाच्या खालचा गाळ काढण्यासाठी सर्वेक्षण करून तेथील गाळ काढावा. बेटावरील ग्रामस्थांची पायवाट तशीच ठेवून अतिरिक्त गाळ काढण्याची सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.या बैठकीला मुख्यमंत्री सचिव भूषण गगराणी, परिवहन सचिव पराग जैन, जलसंपदा मुख्य इंजिनियर कपोले, मेरीटाईम अधिकारी संदीप कुमार, महसूल सचिव नितीन करीर, परिवहन आयुक्त शेखर चनने, जगदीश पाटील, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, प्रांताधिकारी प्रवीण पवार, आमदार योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, नामचे मल्हार पाटेकर, गणेश थोरात, समितीचे राजेश वाजे, अरुण भोजने, बापू काणे, किशोर रेडीज, महेंद्र कासेकर, उदय ओतरी, उमेश काटकर, सचिन रेडीज, सागर रेडीज उपस्थित होते.
९ रोजी आदेश काढाया कामासाठी ‘नाम’तर्फे डंपरही देण्याचे ठरले. १.७२ कोटी शिल्लक रकमेतून पहिल्या टप्प्यातील गाळ काढण्यात येणार आहे. नामतर्फे चिपळूणसाठी २५ पोकलेन देण्याची तयारी दाखवली आहे. याबाबत ९ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांनी आदेश काढावे, अशा सूचना उदय सामंत यांनी दिल्या.