राजापूर : तालुका फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर असोसिएशनची बैठक चारुदत्त नाखरे यांंच्या स्टुडिओमध्ये अध्यक्ष राजेश खांबल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत १९ ऑगस्ट रोजी होणार्या जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्याचे ठरवले. या बैठकीत फोटोग्राफर प्रदीप कोळेकर, चारुदत्त नाखरे, कलीम मुल्ला, प्रशांत भडेकर यांनी मार्गदर्शन केले.
लोकनृत्य स्पर्धा
लांजा : संस्कृती फाऊंडेशन, लांजा रत्नागिरी संस्थेतर्फे राज्यस्तरीय खुली लोकनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी स्पर्धकाला वयोगटाचे बंधन नाही. सादरीकरण करण्याअगोदर स्वत:चे नाव, गाव, मोबाईल नंबर सांगून व्हिडीओ करावा. नृत्यासह एकूण कालावधी ५ मिनिटे राहील. व्हिडीओ पाठविण्याची अंतिम तारीख ३० जुलै असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
वनगुळेत वृक्षारोपण
लांजा : लांजा कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचा राष्टीय सेवा योजना विभाग आणि वन विभाग, रत्नागिरी यांच्यातर्फे वनगुळे येथे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्राचार्य डाॅ. ए. एस. कुलकर्णी, डाॅ. राजेंद्र शेवडे, सरपंच गुरव, ग्रामपंचायत सदस्य, वन विभागाचे आरेकर, विक्रम कुंभार, सामाजिक कार्यकर्ते दत्ता कदम तसेच ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.
राजापूर पालिकेची २६ ला सभा
राजापूर : येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा २६ जुलै रोजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११.३० वाजता ऑनलाईन होणार आहे. या सभेमध्ये आगामी गणेशोत्सवाचे नियोजन करण्यासह विविध योजनांतर्गंत विकासकामांचे प्रस्ताव आदींविषयी चर्चा व निर्णय घेण्यात येणार आहे.
आंदोलनाचा इशारा
रत्नागिरी : प्राथमिक आरोग्य केंद्रात तुटपुंज्या पगारावर काम करणार्या महिला परिचरांनी राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा महिला परिचर महासंघातर्फे जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांना आंदोलनाविषयी निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष आकांशा कांबळे, कल्पना नार्वेकर, स्मिता पडयार, अश्विनी घडशी, आदी उपस्थित होत्या.
विकासकामांना गती
मंडणगड : कोरोनामुळे जिल्ह्यातील विकासकामांची गती मंदावलेली असल्याने तिला अधिक गतिमान करण्यासाठी पाचसुत्री कार्यक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा आढावा घेत प्रशासनाला योग्य सूचना दिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिली. झिरो पेन्डसी, मनरेगा, जलजीवन मिशन, तिसर्या लाटेचा आढावा, तयारी आणि विकासकामांचे प्रश्न यावर अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांना सूचना दिल्या.