चिपळूण: मागील आठवड्यात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली असतानाच मंगळवारी पुन्हा एकदा येथे मुसळधार पावसाने थैमान घातले. वाशिष्ठी व शिवनदीने इशारा पातळी गाठल्याने व बाजारपूल परिसरात पाणी शिरल्याने येथील व्यापारी व नागरिक धास्तावले. परंतू दुपारच्यावेळी ओहोटीला सुरवात झाल्याने काही तासातच पाणी ओसरले. मात्र सायंकाळी ४ वाजल्यापासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आणि चिपळूणकरांच्या अक्षरशः '२६ जुलै २००५'च्या आठवणी ताज्या झाल्या. या संपुर्ण परिस्थितीवर प्रशासन व एनडीआरएफचे पथक सायंकाळी उशीरा पर्यंत लक्ष ठेवून होते. गेल्या काही दिवसापासून चिपळूणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. चारच दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे चिपळूण बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली होती. प्रत्येक विभागात बोटी व अन्य साहित्यांसह पथकही तैनात केले होते. त्यातून शहरात भीती जावून नागरिकांमध्ये सतर्कता निर्माण झाली होती.दरम्यान एक दिवस पावसाने विश्रांती घेऊन उघडीप घेतली होती. त्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरवात झाली. मंगळवारी सकाळी पावसाचा जोर अधिक वाढला आणि पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला. परंतु ओहोटीमुळे वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली नव्हती. वाशिष्ठीची इशारा पातळी ५ मीटर असून धोक्याची पातळी ७ मीटर इतकी आहे. मंगळवारी दुपार पर्यंत ४.६५ मीटर इतकीच पातळी राहिली. त्यावेळी बाजार पुलाजवळील मच्छी मार्केट व नाईक कंपनी परिसरात काहीसे पाणी शिरले होते. नंतर लगेचच ते ओसरले. अठरा वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने २५ जुलै २००५ ला जोरदार पाऊस सुरु झाला आणि '२६ जुलै'ला महापुराने शहरात हाहाकार घातला. चिपळूणकरांच्या त्याच आठवणी २६ जुलैच्या पूर्वसंध्येला ताज्या झाल्या. मंगळवारी ३५ रोजी पावसाचा जोर वाढल्याने प्रशासन पुन्हा एकदा सतर्क झाले. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी तात्काळ यंत्रणा सज्ज करून आपत्ती निवारण पथके यंत्रसामुग्रीसह तैनात केली आहेत. बाजारपुल व अन्य ठिकाणी त्यांनी संयुक्तपणे पाहणी केली. शहरात रिक्षा फिरवून सतर्कतेचे आवाहन वेळोवेळी नागरिकांना केले जात होते. सायंकाळी पावसाचा जोर आणखी वाढला. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर डीबीजे महाविद्यालया समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्या पाण्यातून मार्ग काढताना वाहतूकदारांना मोठी कसरत करावी लागली. पावसाचा जोर लक्षात घेत येथील व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरुवात केली.
पावसाची दोन हजारी पार.... गेल्या २४ तासात येथे सकाळी ८ वाजेपर्यंत १०५ मीली मीटर पाऊस झाला. आतापर्यंत एकूण १९१३.९७ मीली मीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूणात पावसाने दोन हजार मिली मीटरचा टप्पा पार केला. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी झाला असला तरी कमी कालावधीत यावर्षी अधिक पाऊस झाला आहे.