लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २० हजार ४५८ नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यामध्ये पुरुषांना १ लाख ३५ हजार ६१५, तर महिलांना १ लाख १७ हजार ६९४ डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे डोस घेण्यामध्ये महिलांपेक्षा पुरुषच पुढे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुरुवातीला लसीकरणाकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर लसीकरणासाठी गर्दी होऊ लागली. जिल्ह्यात लसीकरण सुरू झाल्यापासून लसीकरणाला सर्वाधिक पुरुष प्राधान्य देत आहेत. मात्र, महिलांचे प्रमाण कमी आहे. याची कारणे वेगवेगळी असली तरी, अनेक महिलांना घरकामातून वेळ मिळत नाही. त्यामुळे बहुतांश महिला लसीकरणापासून दूर राहिल्या असल्यानेच पुरुषांपेक्षा त्यांचे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. पुरुष लसीकरणामध्ये आघाडीवर आहेत.
जिल्ह्यात ६० वर्षावरील ८६,४२९ नागरिकांनी लस घेतली आहे. तसेच ४५ ते ५९ वर्षांपर्यंतच्या १ लाख १ हजार २९७ नागरिकांना, तर १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या ६५ हजार ५४९ नागरिकांना लस देण्यात आलेली आहे. त्यामध्ये कोविशिल्डचे १ लाख ४६ हजार ७७३ आणि काेव्हॅक्सिनचे ७३ हजार ६८५ लसीकरण झाले आहे.
लसीकरण केंद्रांवर गर्दी
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांकडून टाळाटाळ करण्यात येत होती. मात्र, एप्रिल, मे महिन्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व समजले. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ लागली.
मी लस नाही घेतली, कारण?
लसीकरणाबाबत गैरसमज होता म्हणून लस घेतली नव्हती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लस घेणे अत्यंत गरजेचे आहे. लसीकरणामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. लस घेतल्यास कोरोनाशी लढा देऊ शकतो. त्यामुळे मी आता लवकरच लस घेणार आहे.
- वहिदा खान, रत्नागिरी
लसीकरणासाठी आम्ही बराच प्रयत्न केला. मात्र, वारंवार लस संपली आहे, असे सांगण्यात आले. त्यानंतर अनेक वेळा ऑनलाईन नोंदणीही होत नव्हती. लसीकरणात अडचणी येत असल्याने आम्ही लसीकरणापासून वंचित राहिलो. पण मी लस घेणारच आहे.
- सुजाता चव्हाण, रत्नागिरी.
पहाटेपासून रांग...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीषणता पाहून अनेकांनी लसीकरण केंद्रांवर रांगा लावण्यास सुरुवात केली. यामध्ये पुरुष आघाडीवर होते. कारण ते पहाटे ५ वाजल्यापासून लसीकरण केंद्रांवर रांग लावत होते. त्यामुळे लसीकरणात महिला मागे राहिल्या.