रस्त्याची दुरवस्था
दापोली : तालुक्यातील कोकंबआळी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. खड्डयातून मार्गक्रमण करणे अवघड बनले आहे. खड्डयात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहन खड्डयातून जाताना पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी उडत आहे.
संत सेना महाराज पुण्यतिथी
दापोली : शहरातील पेन्शनर्स सभागृहात दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता श्री संत सेना महाराज पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून, कोरोनामुळे शासकीय नियमावलीचे पालन करून कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.
काेरोना चाचणी
गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत कोरोना तपासणी करण्यात आली. तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी डाॅ. अमोल भोसले यांनी गणेशोत्सवाच्या काळात दुकाने सुरू ठेवायची असतील तर कोरोना चाचणी करून घेण्याची सूचना व्यापाऱ्यांना करण्यात आली होती. व्यापाऱ्यांनी सूचनेचे पालन करीत कोरोना तपासणीसाठी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली.
तहसीलदारांना निवेदन
दापोली : दापोली तालुका राष्ट्रीय वारकरी साहित्य परिषदेतर्फे वारकरी, गायक, वादक, वीणेकरी यांना शासनाकडून मानधन त्वरित देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. कोरोना काळात समाज प्रबोधन करणाऱ्या कलाकारांना पाच हजार रुपये मानधन देण्याचे शासनाने कबूल केले होते.
प्रवेश प्रक्रिया सुरू
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या येथील स्वर्गीय चित्रकार, पद्मभूषण धनंजय कीर उपपरिसरामध्ये दोन नवीन अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. ॲक्वाकल्चर हा नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. इंडस्ट्रीयल सेफ्टी ॲण्ड मॅनेजमेंट डिप्लोमा कोर्स दुसरा असून, दि. ८ सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.
नगराध्यक्षांना निवेदन
रत्नागिरी : येथील नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेने ठाणे येथील सहाय्यक आयुक्तांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून कामकाज बंदचा निर्णय घेतला आहे. गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी संघटनेतर्फे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या २०२१ - २०२६ या कालावधीच्या संचालक मंडळ सदस्यांच्या निवडणुकीसंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग यांची जिल्हा सहकारी निवडणूक केली आहे. बॅंकेची प्रारूप मतदार यादी अंतिम करण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
लिंगायत यांची निवड
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथील दत्ताराम धोंडू लिंगायत यांची महाराष्ट्र कर्जदार, जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीच्या संगमेश्वर तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात लिंगायत यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष मुजफ्फर मुल्ला, जिल्हा संघटक सी. ए. जाधव, जिल्हा सचिव प्रदीप मोहिते उपस्थित होते.
गणपती सजावट स्पर्धा
रत्नागिरी : रत्नागिरी राष्ट्रवादी युवक विद्यार्थी व शहर काँग्रेसतर्फे रत्नागिरी तालुका मर्यादित गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर दि. १४ सप्टेंबरपर्यंत स्पर्धकांनी व्हिडिओ पाठविणे अनिवार्य आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क नसल्याचे युवक राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश सचिव बंटी वणजु यांनी सांगितले आहे.