रत्नागिरी शहरातील धनजी नाका येथील व्यापारी दिलावर शेमना यांना व्यापाऱ्यांकडून मदत देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या दुकानातील खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : स्वतःवर लॉकडाऊनचे संकट असतानाही निसर्ग चक्रीवादळात बाधित कुटुंबियांना लाखो रुपयांची मदत करणाऱ्या रत्नागिरीतील व्यापाऱ्यांनी गुरूवारीही आपले दातृत्व दाखवले. शहरातील धनजी नाका येथील व्यापारी दिलावर शेमना यांना आर्थिक मदतीचा हात दिल्याने अंधाराच्या साम्राज्यात अडकलेले दिलावर शेमना यांचे दुकान पुन्हा प्रकाशमान झाले आहे.
शहरातील धनजी नाका येथे दिलावर शेमना यांचे फोटो फ्रेम तयार करण्याचे छोटेसे दुकान आहे. लॉकडाऊनच्या संकटात त्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला होता. वीजबिल थकल्याने काही महिन्यांपूर्वी महावितरणने वीजप्रवाह खंडित केला. पाणी बिल, मुलांची शाळेची फी सर्वच थकले. अखेरीस मोठ्या आशेने शेमना यांनी रत्नागिरीतील व्यापाऱ्यांकडे धाव घेतली. या व्यापाऱ्यांनी चक्रीवादळात बाधित झालेल्या कुटुंबियांसाठी शहरातील व्यापाऱ्यांकडून मदत गोळा केली होती. त्यापैकी काही शिल्लक असणाऱ्या रकमेतून शेमना यांचे वीजबिल भरण्यात आले. त्यानंतर महावितरणने त्यांचा वीजपुरवठा सुरू करून दिला.
यावेळी राजकुमार जैन, गणेश भिंगार्डे, नीलेश शामकांत मलुष्टे, हेमंत वणजू, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी संजय वैशंपायन, मकरंद खातू, सौरभ मलुष्टे, योगेश मलुष्टे, संदेश गांगण, मुकुल मलुष्टे, सचिन केसरकर, कौस्तुभ दीक्षित, अमेय वीरकर हे व्यापारी उपस्थित होते. रत्नागिरीतील प्रत्येक व्यापाऱ्याचे योगदान या मदतीत असल्याने या युवा व्यापाऱ्यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहेत.