रत्नागिरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या हवामान विषयक पूर्व सूचनेनुसार, जिल्ह्यात १४ ते १६ मार्च या कालावधीत तापमानात वाढ होणार असून, या तीन दिवसांत जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी काय करावे व काय करू नये, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या आहेत. थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था आदी उष्माघाताची लक्षणे आहेत.
ही लक्षणे आढळल्यास उपचार म्हणून रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे. खोलीत पंखे, कूलर ठेवावेत, वातानुकूलित खोलीत ठेवावे. रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आइसपॅड लावावेत. आवश्यकतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने शिरेवाटे सलाईन देणे आदी गोष्टी कराव्यात.
उष्माघातात तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीतजास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/ टोपी, बुट व चपलांचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किवा छत्रीचा वापर करावा. ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक आदींचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
या गोष्टी करू नयेत
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.