लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तालुक्यातील चांदोर-साठरे गुंजाळ गावातील संदेश रसाळ हा तरुण बारावीनंतर आयटीआय करून, मुंबईतील खासगी कंपनीत नोकरीवर रुजू झाला. नोकरीला लागून जेमतेम वर्षच झाले होते. कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित झाले व नोकरी गेली. गावाकडे परतल्यानंतर सहा महिने काय करावे, हाच विचार सुरू होता. अखेर शेती करण्याचा निर्णय संदेशने घेतला. सहा महिने त्याने केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ प्राप्त होऊ लागल्याने भविष्यात शेतीच करायचा निर्णय त्याने घेतला आहे.
संदेशने आपला मित्र योगेश याला ही कल्पना सांगतातच, योगेशच्या वडिलांनी प्रोत्साहन दिले. योगेश व धाकटा भाऊ सुयोग यांच्या मदतीने गावातील पडीक जमीन मक्तेदारी पद्धतीने घेऊन त्यामध्ये कलिंगड, भेंडी, वाली, वांगी, मका, मटार, हिरवी मिरची, काकडी लागवड केली असून, उत्पादन सुरू झाले आहे. नोव्हेंबरमध्ये लागवड करण्यापूर्वी योग्य नियोजन केले. भाड्याने ट्रॅक्क्टर घेऊन नांगरणी केली. वाफे तयार करून प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र भाग केले आहेत. लागवडीसाठी नर्सरीतून चांगल्या प्रकारची रोपे विकत आणली. खत व्यवस्थापन, योग्य नियोजन, यामुळे पिकेही तरारली व उत्पादन सुरू झाले. विक्रीवरही स्वत:च लक्ष केंद्रित केले आहे. शेतीमध्ये पैसा वाचवायचा असेल, तर अंगमेहनत प्रचंड आहे. चिकाटी व प्रयत्नाची जोड असेल, तर यश नक्कीच प्राप्त होते, म्हणून संदेशने आता नोकरीच्या मागे न लागता भविष्यात शेतीच करण्याचा निर्णय घेतला असून पावसाळ्यात कारली, भेंडी उत्पादन घेण्याचा मानस आहे.
कलिंगडाचे पीक धोक्यात
उष्म्यामुळे कलिंगडाचा खप चांगला होतो. त्यामुळे संदेशने कलिंगडाचे दोन स्वतंत्र प्लॉट तयार करून लागवड केली आहे. एका प्लॉटमध्ये संदेशला चांगले उत्पन्न मिळाले. मात्र, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे दुसऱ्या प्लॉटवर वेलमर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, कलिंगडांची वाढ खुंटली आहे. मात्र, यामुळे निराश न होता, नव्या उमेदीने संदेश मेहनत घेत आहे. घरची अवघी सहा गुंठे जमीन, स्वत: शेतातही कधी न गेलेल्या संदेशने आता शेतीच करण्याचा निर्णय घेतला आहे.