रत्नागिरी : कोरोनाच्या संकटात आरोग्य यंत्रणेच्या साहाय्याला धावून आलेले सर्व सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आता कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठीही देवदूत ठरत आहेत. एकाच छताखाली काम करणाऱ्या या विविध कार्यकर्त्यांपैकी काही कोरोनाशी थेट लढताना स्वत:ही बाधित झाले. मात्र, रुग्णांना दिलासा देतानाच या बाधित कार्यकर्त्यांनी कोरोना सेंटरमध्ये असलेल्या आपल्या काही दिवसांच्या वास्तव्यात कोरोना सेंटरचे वातावरण आल्हाददायी केले. कोरोनावर मात करून बाहेर पडताना इतर रुग्णांनाही त्यांनी ‘Be Positive And Get Negative’ असा संदेश दिला.
कोविड सेंटरमधील वातावरण साधारणत: तणावपूर्ण वातावरणाने भरलेले असते, असा सामान्य नागरिकांचा समज झालेला आहे; पण रत्नागिरीतील कोविड सेंटरमधील वातावरण बदलून ते चैतन्यदायी - आल्हाददायी ठेवण्यासाठी हेल्पिंग हँड्सचे कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाइकांसाठी देवदूत असणारे, हेल्पिंग हँड्सचे आघाडीवर राहून काम करणारे सचिन शिंदे, छोटू खामकर आदी कार्यकर्ते स्वत:ही बाधित झाले. त्यामुळे ते स्वत: शहरातील सामाजिक न्याय भवन येथील कोरोना सेंटरमध्ये दाखल झाले; पण आपल्या आजारपणात न रमता त्यांनी विविध मनोरंजक खेळ, गाणी आदींच्या माध्यमातून विविध करमणुकीचे उपक्रम करत तिथल्या कोरोना रुग्णांना करमणुकीतून कोरोनाशी आनंदाने कसा लढा द्यायचा, हे शिकवले. या रुग्णांमध्ये काही बालकांचाही समावेश होता. मात्र, या कार्यकर्त्यांमुळे तिथले गंभीर वातावरण बदलून ते आनंददायी झाले.
प्रत्येक कोविड सेंटरला काही ना काही चैतन्यदायी उपक्रम राबवून तिथले वातावरण आनंदी करण्याचा ध्यास ‘हेल्पिंग हँड्स’च्या स्वयंसेवकांनी घेतला आहे. यासाठी हेल्पिंग हँड्सचे कार्यकर्ते अनेक उपक्रम राबवत आहेत. लहान मुलांना विविध प्रकारचे खेळ खेळायला सांगून त्यांच्यात सकारात्मक विचार उत्पन्न करावेत आणि त्यांची पाॅझिटिव्ह एनर्जी वाढून त्यांना रुग्णालयातून लवकर बाहेर पडायला मिळावे, असे उपक्रम दर दिवशी घेतले जात आहेत. त्यात पालकही मदत करत आहेत.
‘कराओके स्पिकर’वरून विविध प्रकारची गाणी लावून युवकांसह कुठल्याही वयोगटातील रुग्णाला व्यक्त होतानाच कोरोनाच्या गंभीर आजारातही जगण्याची नवी उमेद मिळत आहे. काही रुग्ण स्वतः कराओकेवर गाणी सादर करून आपल्याबरोबर असलेल्या इतर रुग्णांना जगण्याची हिंमत देत आहेत. विविध खेळ खेळूनही सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे काम हेल्पिंग हँड करत आहे. यातूनच ‘नेहमी हसा, खेळा, समतोल आहार घ्या आणि कोरोनाला आपल्या आयुष्यातून लवकर घालवा,’ असा बहुमोल संदेश देत आहेत.