मंडणगड : दुरुस्तीच्या कामानिमित्त बंद असलेल्या म्हाप्रळ - आंबेत पुलाचे काम आठवड्यात पूर्ण होणार असून, २६ व २७ जून २०२१ रोजी पुलाची अवजड वाहनांची वाहतुकीची क्षमता तपासून पूल वाहतुकीला खुला करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग खनिकर्म व पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. त्यांनी साेमवारी या पुलाच्या दुरुस्ती कामाची सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकाऱ्यांसमेवत पाहणी करून आढावा घेतला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, हा पूल रायगड - रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. मार्गावरील वाहतूक हा दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती व्हावी, अशी मागणी होत आहे. त्याकरिता प्रस्तावही तयार करण्यात आला आहे़ त्याला मंजुरी आणण्यासाठी पाठपुरावा करत आहे. पुलाची दुरुस्ती सुरू करण्यात आल्याने स्थानिक व प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी जेटीचा पर्याय प्रथम उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुलाच्या दुरुस्तीच्या कामानिमित्त आतापर्यंत दहा ते अकरा कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. पुलाच्या कामाची पाहणी केल्यानंतर २६ व २७ जून २०२१ रोजी क्षमता तपासून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे़ तसेच पुलाचे उर्वरित काम हे पावसाळ्यानंतर चार दिवस वाहतूक बंद ठेवून पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी यावेळी दिली.
यावेळी माजी आमदार संजय कदम, तालुकाध्यक्ष मुझ्झफर मुकादम, प्रकाश शिगवण, रमेश दळवी, भाई पोस्टुरे, अजय बिरवटकर, वैभव कोकाटे, नितीन म्हामुणकर, लुकमान चिखलकर, सुभाष सापटे, राहुल कोकाटे, सचिन बेर्डे, युवराज जाधव, राकेश साळुंखे, दीपक घोसाळकर, रूपेश साळुंखे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली मंडणगड तालुक्यातील सर्व प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भूतकाळात मोठे काम केले आहे. म्हाप्रळ - आंबेत पुलावरून महानगरांकडे होणारी वाहतूक बंद झाल्याने तालुक्याचा जगाशी असलेला संपर्क तुटू पाहत होता़ लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीने सातत्याने पाठपुरावा केल्याचे तालुकाध्यक्ष मुझ्झफर मुकादम यांनी सांगितले.
-----------------------------
मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ - आंबेत पुलाची उद्योग खनिकर्म व पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी पाहणी केली़ यावेळी माजी आमदार संजय कदम व तालुकाध्यक्ष मुझ्झफर मुकादम, प्रकाश शिगवण, रमेश दळवी उपस्थित हाेते़