आवाशी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (एमआयडीसी) प्रदूषणाशी कोणताही संबंध येत नाही. मात्र, तरीही औद्यागिक वसाहती मधील सांडपाणी समस्येबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरले जाते. हे योग्य नसल्याचे मत खेर्डी, चिपळूण येथील उपअभियंता के. डी. पाटेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.घाणेखुंट - खोडेवाडी येथे सीईटीपीतून रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या एमआयडीसीच्या पाईपलाईनला गळती लागल्याच्या वृत्ताबाबत माहिती देताना ते बोलत होते. रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम सीईटीपीने केले पाहिजे. ते होते की नाही हे पाहणे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काम आहे. मात्र, अनेकदा अशा घटनांमध्ये एमआयडीसीला जबाबदार धरले जाते. सीईटीपी व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आम्ही याबाबत अनेकदा पत्रव्यवहारही केला आहे. सोमवारीदेखील काही कंपन्यांमधून रासायनिक सांडपाणी नाल्याला सोडल्याचे कोतवली ग्रामस्थ व आमच्या लक्षात आले. त्यावेळी आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाला बोलावून घेतले. संबंधित अधिकाऱ्यांनी ‘त्या’ कंपन्यांची पाहणी करुन अहवाल त्यांच्या वरिष्ठांकडे पाठविला. मात्र, सद्यस्थितीत गळती लागलेली वाहिनी ही अजूनही बंदच आहे.गेले दोन दिवस सीईटीपीतूनही पाणी सोडण्याचे काम बंद आहे. स्थानिक ग्रामस्थ, एमपीसीबी, सीईटीपी व असोसिएशन यांनी एकत्र बसून या समस्येवर व कोतवली ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत विचार करणे गरजेचे आहे. सीईटीपीचे अध्यक्ष सतीश वाघ हे सध्या परदेशात असून, १४ आॅक्टोबरला ते लोटे येथे येणार असल्याचे पाटेकर यांनी सांगितले. त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थांचे एमआयडीसीला व आमचेही त्यांना कायम सहकार्य असते. मात्र, ग्रामस्थांच्या मागण्या समजून घेणे हे संपूर्ण असोसिएशनचे काम असून, आम्ही आमचे काम दिवस-रात्र प्रामाणिकपणे करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे थेट प्रदूषणाशी एमआयडीसीचा कोणताही संबंध नाही.याचबरोबर ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची खेड पोलिसांनीदेखील दखल घेतली असून, ग्रामस्थांच्या आरोग्याच्यादृष्टीने गळती लागलेल्या वाहिनीची पाहणी करणार असल्याची माहिती लोटे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एच. काकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (वार्ताहर)
एमआयडीसीचा प्रदूषणाशी संबंध नाही
By admin | Published: October 06, 2016 10:10 PM