राजापूर : रेल्वे स्टेशन परिसरात होऊ घातलेल्या एमआयडीसीची जागा बदलून सोलगाव, गोवळ परिसरात नेण्यात आली आहे. सर्व सोयीनीयुक्त असलेल्या नियोजित जागेत बदल का करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही जमीन माफियांच्या फायद्यासाठीच ही जागा बदलण्यात आल्याची चर्चा राजापूर परिसरात सुरू आहे.
तालुक्यातील युवकांना रोजगार मिळावा म्हणून तालुक्यात एमआयडीसी उभारण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. याची दखल प्रथम माजी राज्यमंत्री भाई हातणकर यांनी घेतली हाेती. त्यावेळी पन्हळे, तळगाव दरम्यान ही लघुउद्योग वसाहत उभारण्याचा घाट घालण्यात आला हाेता. मात्र, त्यावेळी ही वसाहत रानतळे येथे उभारण्यात यावी, असा सूर उमटू लागला हाेता. त्यानंतर अद्यापही हे घाेंगडे भिजत राहिले. त्यानंतर माजी आमदार गणपत कदम यांनी सर्व सोयी उभारत राजापूर रोड रेल्वे स्टेशन परिसरातील जागेची निवड केली हाेती. त्यांनी प्रथम विजेचा प्रश्न सोडविताना ओणी येथे विद्युत सबस्टेशनची उभारणी केली. पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी पांगरे धरणाची उभारणी केली. हसोळ व सोल्ये गावांमध्ये छोट्या धरणाचे बांधकाम करण्यासाठी जागेचे सर्वेक्षण केले हाेते. गोपाळवाडी धरणाचे पाणी मिळविण्यासाठी व अर्जुना माध्यम प्रकल्पाचा कालवा हा ताम्हाणे पहिलीवाडी नियोजित असून, हा कालवा पुढे पाच-सहा किलाेमीटर वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर केला. वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी रेल्वेचा लाभ होणार होताच, शिवाय या ठिकाणी रस्त्याचेही जाळे विणले गेलेले आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनजवळील पठारावर ही जागा निश्चित करण्यात आली होती.
या ठिकाणाहून सौंदळ मार्गे कोल्हापूर, रत्नागिरी, केळवली भुईबावडा मार्गे कोल्हापूर, केळवळी, खारेपाटण तरळे मार्गे कोल्हापूर गोवा, सिंधुदुर्ग, तर रेल्वे स्टेशन, हसोळ, ससाळे, आंगले मार्गे राजापूर शहरांना जोडणारे रस्त्याचे जाळे विणलेले आहे. तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांनी या एमआयडीसीला हिरवा कंदील दिला होता. त्यानंतर पुढील दोन विधानसभा निवडणुकीमध्ये काही राजकीय पक्षांनी याचे भांडवल करीत मते मिळविली. मात्र, गेली दहा वर्षे हा प्रश्न प्रलंबित ठेवला. गतवर्षी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. मात्र, सर्वसोयीनीयुक्त असलेल्या जागेला डावलून ही वसाहत गोवळ, सोलगाव परिसरात उभारण्याचा घाट घालण्यात आला. या परिसरात ही वसाहत उभारताना प्रथम पाणी, वीज, रस्त्याचा प्रश्न सोडवावा लागणार आहे. सुविधा उपलब्ध नसलेली जागा का निवडण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काेणाच्या फायद्यासाठी ही एमआयडीसी उभारली जात आहे, असाही प्रश्न उपस्थित हाेत आहे.