रत्नागिरी : अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी एस. टी. महामंडळाने दहा वर्षापूर्वी मिडी बसेस आणल्या होत्या; मात्र मिडी बसेस महामंडळाच्या ताफ्यातून लवकरच हद्दपार होणार आहेत.
ग्रामीण भागातील अरूंद रस्ते, घाटमाथा, वाड्या-वस्त्यांवर सहज पोहोचता यावे, यासाठी २०१० पासून ग्रामीण भागात २४ आसनी मिडी बसेस धावत होत्या. २०१० ते २०१२ पर्यंत मिडी बसेसची संख्या वाढली होती. रत्नागिरी विभागात ५० मिडी बसेस धावत होत्या. लांजा, रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, दापोली, देवरूख आगारातून या बसेससाठी प्रवाशांना चांगला प्रतिसाद लाभत होता; मात्र वापरानंतर सततचे बिघाड, दुरुस्तीचा अभाव यातून या गाड्यांचे आयुर्मान संपले आहे. कोरोनामुळे आधीच प्रवासी संख्येत घट झाली असून, ज्या मार्गावर या गाड्या धावत होत्या, त्या मार्गावर विभागातून शटलफेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे आयुर्मान संपलेल्या गाड्या वापरास बंद करण्यात आल्या आहेत.