दापोली : दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने खबरदारी म्हणून दापोली तालुक्यातील पाणी भरण्याची शक्यता असणाऱ्या १५ गावांमधील २८० कुटुंबांमधील १,३२९ नागरिक आणि ८ दरडप्रवण ठिकाणच्या ३१३ कुटुंबांमधील १,१८१ अशा एकूण ५९३ कुटुंबातील २,५१० लोकांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी रात्रीपर्यंत हे स्थलांतर करण्याची तयारी तालुका प्रशासनाने केली आहे, अशी माहिती दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिली.
यापूर्वीच्या चक्रीवादळांमध्ये अनेक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले होते. आता अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन त्याच कुटुंबांना पुन्हा एकदा स्थलांतरित करण्यात येत आहे. यातील बहुतेक कुटुंबांना पावसाळ्यापूर्वीच दोन महिने घरात राहू नये, अशाप्रकारच्या नोटीस महसूल विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.
हर्णै, पाजपंढरी ही गावे किनाऱ्याला लागून असल्याने त्यांना याचा सर्वाधिक धोका असतो. पाजपंढरी गावातील सुमारे १ हजार लोकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.