चिपळूण : गेल्या १० महिन्यांच्या कालावधीत ज्यांनी वीजबिले भरलेली नाहीत, अशा ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यास महावितरणने सुरुवात केली आहे. थकीत वीजबिलांमध्ये बड्या व्यावसायिकांचाच जास्त समावेश आहे. त्यांचे वीज पुरवठा तोडण्यास गेल्यावर थेट ऊर्जामंत्री, ग्रामविकास मंत्री व माजी खासदारांकडे धाव घेतली तरीही त्यांना बिल भरण्याची सूचना झाली. पुढील दोन दिवसांत बिल न भरल्यास त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवसाय, उद्योगधंदे ठप्प झाले होते. त्यातच राजकीय पुढाऱ्यांकडून वारंवार वीजबिले माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले. वीजबिल कमी होइल, काही प्रमाणात सूट मिळेल, या आशेपाटी अनेकांनी वीजबिले न भरण्याचा निर्णय घेतला. चिपळूण विभागात १२ हजार ७२९ ग्राहकांनी एप्रिल २०२० पासून १० महिन्यांच्या कालावधीत एकही बिल भरलेले नाही. यात बड्या व्यावसायिकांची थकित रक्कमही जास्त आहे.वालोपे येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय प्रसिद्ध मोठ्या हॉटेल व्यावसायिकाने सुमारे १२ लाखांचे वीजबिल थकवले आहे. महावितरणकडून या व्यावसायिकाला अनेकदा बिल भरण्याची सूचना देण्यात आली. प्रतिसाद मिळत नसल्याने महावितरणचे कर्मचारी कारवाईस गेले. तेव्हा हॉटेल मालकाने एका माजी खासदारांना फोन केला.माजी खासदाराने थेट ऊर्जामंत्र्यांशी संपर्क साधला. ऊर्जामंत्र्यांनी पुन्हा महावितरण अधिकाऱ्यांनी संपर्क साधला. याविषयात मंत्र्यांपर्यंत विषय गेला, तरी त्यास फारशी मुभा मिळालेली नाही. त्याने त्वरित २ लाख जमा केले. उर्वरित बिल दोन दिवसांत भरण्याचे आश्वासन दिले. महामार्गावरील आणखी एका हॉटेल व्यावसायिकाचे ६ लाख थकित आहेत. त्याने ५० हजार भरण्याची तयारी दर्शवली.
उर्वरित बिलाची रक्कम न जमा झाल्यास त्वरित वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे सावर्डेतील एका उद्योजकाने लाखोंचे बिल थकवले. गेले काही दिवस मात्र कर्मचारी त्याच्याकडे बिलासाठी फेऱ्या मारत आहेत. मात्र, त्यास दाद दिली जात नाही. त्यामुळे दोन दिवसांत या उद्योजकाचाही वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.तब्बल ८०० जणांचा पुरवठा खंडितमहावितरणकडून आतापर्यंत ८०० वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामध्ये चिपळुणातील ६०० व गुहागरच्या २०० ग्राहकांचा समावेश आहे. ग्राहकांनी वीजबिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.१२ कोटी थकीतचिपळूण विभागात १२,७२९ ग्राहकांचे १२ कोटी ६५ लाख थकीत आहेत. त्यामध्ये २ कोटी गुहागरमधील आहेत.