चिपळूण : कोरोना प्रादुर्भावात विनामास्क फिरणे ४०४ नागरिकांना चांगलेच महागात पडले. येथील नगर परिषदेच्या भरारी पथकाने या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारत त्यांच्याकडून तब्बल २ लाख २ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई मार्च महिन्यापासून आतापर्यंत करण्यात आली.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून येथील महसूल, आरोग्य, पोलीस व नगर परिषद प्रशासन जिकरीचे प्रयत्न करीत आहे. तसेच शासनाने नागरिकांसाठीही काही बंधने घालून दिली आहेत. घराबाहेर पडताना मास्क, सॅिनटायझर यांचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, अशा सूचना प्रशासकीय स्तरावरून देण्यात आल्या आहेत. मात्र, काही नागरिकांकडून राजरोसपणे या सूचनांचे उल्लंघन होत असल्याच्या अनेक तक्रारी नगर परिषद प्रशासनाकडे येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन नगर परिषदेने शहरात भरारी पथक नेमले. या पथकाव्दारे विनामास्क फिरणाऱ्यांवर ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली.मार्च महिन्यापासून ही कारवाई सुरू आहे. आजपर्यंत शहरासह परिसरात ४०४ जण विनामास्क फिरताना आढळून आले. त्यांच्याकडून २ लाख २ हजार रुपयांचा दंड नगर परिषदेने वसूल केला. गेल्या महिन्यात दंडात्मक कारवाईची मोहीम कारवाई बंद करण्यात आली होती.
मात्र अलिकडच्या काळात टप्प्याटप्प्याने होणाऱ्या अनलॉकमुळे बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे काही दिवसांपासूना या भरारी पथकाने ही मोहीम हाती घेतली आहे. या भरारी पथकात अमित पाटील, सौरव गवंडे, राजू खातू, बापू साडविलकर आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दंडात्मक कारवाईची मोहीम अधिक तीव्र होईल, असे उपमुख्याधिकारी बाळकृष्ण पाटील यांनी सांगितले.