खेड : तालुक्यासह शहरात कोरोनाच्या वाढत्या
संसर्गामुळे विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची
मोहीम नगर प्रशासन व पोलिसांच्या पथकाने हाती घेतली आहे आहे. आतापर्यंत ३२५ जण कारवाईच्या कचाट्यात अडकले असून १ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी दिली.
शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले
आहेत. बाजारपेठेत वावरताना मास्क वापरणे
बंधनकारक केले आहे. मात्र, तरीही
बहुतांश नागरिक मास्क न वापरताच बाजारपेठेत बिनधास्तपणे वावरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्धची मोहीम तीव्र केली आहे.
कोणत्याही क्षणी पोलीस व नगर प्रशासनाचे पथक कारवाईची मोहीम राबवत असल्याने अनेकजण कारवाईच्या कचाट्यात अडकत आहेत. नगर प्रशासनाने नागरिकांना मास्क वापरण्याच्या सक्त सूचना करत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचनाही ध्वनिक्षेपकाद्वारे केल्या होत्या.