चिपळूण : तालुक्यातील बोरगाव येथील खाणींची एटीएस मशीनद्वारे मोजणी झाल्यानंतर तहसीलदारांनी काही दिवसांपूर्वीच कारवाईच्या नोटिसा दिल्या आहेत. यामध्ये चार खाण मालकांना सुमारे अडीच कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांनी पाठपुरावा केला होता.दरम्यान, दरवर्षी रितसर रॉयल्टी भरून परवाने घेतो, तरीही ही कारवाई झाल्याने खाण मालकांनी कारवाईविरोधात अपील केले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव, कौंढर आणि चिवेली गावातील अनधिकृत दगड खाणी आणि शासनाचा बुडित महसूल याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर दत्ताराम साळुंखे यांनी गेल्या दोन वर्षांपासून तालुकास्तरावर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा केला. तक्रारीत तथ्य नसल्याचे सांगत केलेली तक्रार निकाली काढण्यात आली.दरम्यान, साळुंखे यांनी दगड खाणीबाबत माहिती अधिकारात कागदपत्रे मिळवली. त्याआधारे महाराष्ट्र शासन महसूल विभागाकडे तक्रार केली.
शासनाने त्यांच्या तक्रारीची दखल घेत बोरगाव परिसरातील २२ दगड खाणींची एटीएस मशीनद्वारे मोजणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार २२ खाणींपैकी फक्त ४ दगड खाणीचीच मोजणी करण्यात आली. दरम्यान, खाण मालकांनी भरलेली रॉयल्टी आणि एटीसची मोजणी यातील तफावत समोर आली. त्यानुसार ४ खाण मालकांना सुमारे अडीच कोटीचा दंड ठोठावण्यात आला आहे. तलाठ्यांच्या आणि एटीएस मोजणीत फरक पडल्याने हा दंड ठोठावण्यात आला.
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. एकूण २२ दगड खाणींपैकी १४ खाणींची माहिती महसूल तहसील कार्यालयाकडे उपलब्ध नाही. दप्तर गहाळ झाले तरी त्याबाबत पोलिसांत तक्रार झालेली नाही. विभागीय आयुक्तांकडे तक्रारीच्या अनुषंगाने अहवाल सादर करण्यास सांगूनही अजून अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे पुन्हा स्मरणपत्र दिले आहे.- विद्याधर साळुंखे, बोरगाव