रत्नागिरी : विजेची बचत व्हावी यासाठी मिनी मंत्रालयातील विद्युत पुरवठा लवकरच सौरऊर्जेद्वारे होणार आहे. मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेत हा सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याबाबत ‘मेढा’च्या अधिकाऱ्यांकडून परिषद भवनची पाहणी करण्यात आली. यावेळी प्रत्येक विभागात किती विद्युत उपकरणे आहेत, त्याबाबतचा अहवालही जिल्हा परिषद प्रशासनाकडून नुकताच घेण्यात आला. दिवसेंदिवस विजेचा होणारा वाढता वापर लक्षात घेता, भविष्यात विजेची कमतरता भासणार आहे. तसेच वीजदरातही वाढ झाली आहे. यामुळे जिल्हा परिषदेसाठी सौरऊर्जेचा विचार केला जात आहे. शासकीय कार्यालयांमध्ये विजेचा वापर वारेमापपणे केला जातो. कर्मचारी असो वा अधिकारी हे स्वत:च्या घरी विजेचा वापर काटकसरीने करुन वीजबिल कसे कमी येईल, याचा विचार करतात. मात्र, हेच अधिकारी व कर्मचारी अनेकदा कार्यालयांमधील दिवे दिवसाढवळ्या तसेच चालू ठेवतात आणि काहीवेळा पंख्याची आवश्यकता नसतानाही ते सुरु असतात. मिनी मंत्रालय असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये अनेकदा अनावश्यक वीज, फॅन सुरु असल्याचे चित्र पाहावयास मिळते. चार मजली या इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावरील जिल्हा परिषदेच्या सर्वच खातेप्रमुखांच्या केबीनमध्ये ए. सी. बसविण्यात आले आहेत. तसेच सभागृहातही ए. सी. बसविण्यात आला आहे. त्याचा वापर केवळ सभा किंवा कार्यक्रमांच्या वेळी करण्यात येतो. प्रत्येक विभागामधील दिवे, फॅन मात्र विनाकारण सुरु असतात. त्यामुळे महिन्याला हजारो युनिट विजेचा वापर होतो. विजेचे वाढलेले दर व विजेचा अनावश्यक वापर यामुळे जिल्हा परिषद लाखो रुपये वीजबिलासाठी खर्च करते. या खर्चाच्या बचतीसाठी आता सौरऊर्जेचा पर्याय प्रशासनाने स्वीकारला आहे. सौरऊजेद्वारे वीजपुरवठा झाल्यास जिल्हा परिषदेचे लाखो रुपये वाचणार आहेत. या कामाला आता गती आल्याने पुढील काही महिन्यातच जिल्हा परिषद सौरऊर्जेवर चालणार आहे. (शहर वार्ताहर)
मिनी मंत्रालय आता लवकरच सौरऊर्जेवर
By admin | Published: October 24, 2016 12:14 AM