आॅनलाईन लोकमतरत्नागिरी, दि. १५ : बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरी दौऱ्यावर आल्यानंतर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांची पाहणी करून माहिती घेतली. तसेच तालुक्यातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन विकासकामांविषयी चर्चा केली.राज्यमंत्री चव्हाण हे दोन दिवसांच्या रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी पालवणी (ता. मंडणगड) येथे शहीद जवान राजेंद्र गुजर यांच्या जांभूळ येथील निवासस्थानी जाऊन गुजर कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर दापोली, खेड, मंडणगड या तालुक्यांना भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तालुक्यांतील विकासकामांचा आढावा घेतला. तसेच बुरोंडी येथील मच्छीमार बंदरांची पाहणीदेखील केली. त्यानंतर दापोली तालुक्यातील उसगाव येथील भारती शिपयार्ड कंपनीला भेट देत तेथील समस्या जाणून घेतल्या.
दाभोळ (ता. दापोली) येथील प्रवासी जेटी परिसराला महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड अधिकाऱ्यांसमवेत भेट देत पाहणी केली. तसेच गुहागर तालुक्यातील आरजीपीपीएल प्रकल्पाचीही चव्हाण यांनी पाहणी केली.आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गणपतीपुळे येथे दर्शन घेतल्यानंतर चव्हाण यांनी जयगड येथील जिंदाल उद्योग समूह व आंग्रे पोर्ट उद्योग समूहांना भेट दिली.