रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सामंत आणि गोगावलेंनी पवारांची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेना उधाण आले होते. याबाबत रत्नागिरीत पत्रकार परिषदेत मंत्री सामंत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. ‘ते’ देशाचे नेते आहेत. त्यांना भेटण्यात काय अडचण आहे, असा प्रश्न मंत्री सामंत यांनी केला. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मंत्री उदय सामंत यांनी युवक जिल्हाध्यक्ष पदापासून विविध पदांवर काम केले. २००४ आणि २००९ असे दोनवेळा ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार म्हणून विजयी झाले. शरद पवार यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. २०१४ साली शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही त्यांनी शरद पवार यांच्याशी नाते तोडलेले नाही. मात्र आता त्यांनी आमदार भरत गोगावले यांच्यासह पवार यांची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. रत्नागिरीत पत्रकार परिषदेत याबाबत प्रश्न करण्यात आला असता ही केवळ एक सदिच्छा भेट होती, असे ते म्हणाले. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, त्यांचा सल्ला घेण्यात अडचण काय आहे असेही सामंत यांनी आवर्जून सांगितले.
मंत्री उदय सामंतांनी आमदार भरत गोगावलेंसह घेतली शरद पवारांची भेट, चर्चेना उधाण; सामंत म्हणाले...
By मनोज मुळ्ये | Published: April 01, 2023 3:44 PM