रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अलिकडेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. आता त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया पुन्हा उंचावल्या आहेत.
मंत्री सामंत यांच्याकडे सध्या राज्यातील सर्वच पक्षांचे लक्ष आहे. त्यामुळेच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अनेकांनी तर्कवितर्क सुरू केले. आता शुक्रवारी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अजितदादांचे कौतुक केले. विरोध करताना तो हास्यास्पद होणार नाही, अशाच मुद्द्यांचा करावा, असे अजितदादांनी इव्हीएमबाबत म्हटले आहे. एक माणूस देशभरात असा चमत्कार घडवू शकत नाही. त्यामुळे हास्यास्पद ठरतील, असे मुद्दे घेऊन प्रचार करु नये, अशी स्पष्ट भूमिका अजितदादांनी मांडली.
आपली संस्कृती सोडून कोणावर टीका करू नये, असेही अजितदादा म्हणाले आहेत. त्यांची ही विधाने कौतुकास्पद आहेत. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपली भूमिका मांडली आहे, असे कौतुक मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण खूपच खळबळजनक झाले आहे. सर्वांच्याच भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी वाढल्या आहेत. मात्र अशात एका पक्षाच्या मंत्र्याने विरोधी पक्ष नेत्याचे कौतुक केल्याने सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.