रत्नागिरी : राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्पासाठीचे एक सर्वेक्षण एमआयडीसीकडून केले जाणार आहे. त्याबाबत लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणे, अफवा पसरवणे यासारखी कृत्ये करणाऱ्या तब्बल ४५ लोकांवर जिल्हाबंदी, तालुका बंदी, गावबंदी अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. सोशल मीडियाचा आधार घेत लोकांच्या भावना भडकवणाऱ्या लोकांवरही लक्ष ठेवले जात असून, या यादीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.बारसू भागातील सद्यस्थिती आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस खात्याकडून सुरू असलेली कार्यवाही याबाबत पोलीस अधीक्षकांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड याही उपस्थित होत्या.राजापूर तालुक्यात बारसू भागात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठीचे एक सर्वेक्षण एमआयडीसीकडून होणार आहे. हे सर्वेक्षण कधी सुरू होईल आणि कधीपर्यंत चालेल, याबाबत आपल्याकडे माहिती नाही. मात्र या सर्वेक्षणादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस खाते बारकाईने लक्ष ठेवून आहे. पोलीस खात्याने कोणावरही दडपशाही केलेली नाही. पोलिस केवळ कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, याचेच पालन करत आहेत, असे ते म्हणाले.लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणे, अफवा पसरवणे, समाजमाध्यमांचा दुरुपयोग करणे यासारख्या कारणांमुळे ४५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही जणांना जिल्हाबंदीचे, काही जणांना तालुका बंदीचे तर काही जणांना गावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. दोन लोकांवर अटकेची कारवाई करण्यात आली असून, त्यांना मंगळवार २५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आणखी दोघांवर अशाच पद्धतीने कारवाई करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले.गेल्या काही दिवसात जिल्हाधिकारी तसेच मी या भागातील लोकांच्या बैठका घेतल्या आहेत. आंदोलन करण्यापेक्षा जिल्हा प्रशासनाशी चर्चा करुन लोकांनी आपल्या शंकांचे निरसन करुन घ्यावे, असे आवाहन आम्ही दोघांनीही लोकांना वारंवार केले आहे. मात्र काहीजणांना चर्चा करण्यापेक्षा फक्त विरोधच करायचा आहे, असेही ते म्हणाले.
रिफायनरी प्रकल्पाबाबत गैरसमज, रत्नागिरी जिल्ह्यात ४५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई-video
By मनोज मुळ्ये | Published: April 24, 2023 6:58 PM