लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : तालुक्यातील तळघर-अणसपुरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकानेच प्रधानमंत्री आवास योजनेत लाखो रुपयांचा अपहार केल्याची चर्चा आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर बांधून देतो, असे सांगून वृद्ध महिलेच्या खात्यावर जमा झालेले पैसे काढण्यात आल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
तालुक्यातील तळघर-अणसपुरे गावात प्रधानमंत्री आवास योजना राबविण्याची जबाबदारी असलेल्या ग्रामसेवकाने गावातील या योजनेची लाभार्थी असलेल्या एका वयोवृद्ध महिलेला फसवल्याची तक्रार तिचा नातू संदीप सुरेश डाऊल यांनी केली आहे. आजीच्या बोटांचे ठसे घेऊन तिच्या बँक खात्यात शासनाकडून जमा झालेले तब्बल १ लाख २० हजार रुपये ग्रामसेवकाने परस्पर काढून घेतल्याची तक्रार संदीप डाऊल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
या तक्रारीनंतर खेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांमार्फत आता या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. तळघर-अणसपुरे येथील या घरकुल योजनेच्या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशीही सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. तक्रारदार संदीप डाऊल यांनी केवळ आपल्याच आजीची नाही, तर त्यावर्षी गावात मंजूर झालेल्या २७ घरकुलांमध्येही अशाचप्रकारे पैशांची अफरातफर केल्याचा संशय व्यक्त केला आहे.
---------------------------
प्राथमिक अहवाल वरिष्ठांकडे
खेड तालुक्यातील तळघर-अणसपुरे येथील संदीप डाऊल यांनी घरकुलाची १ लाख २० हजारांची रक्कम ग्रामसेवकाने हडप केल्याची तक्रार केली आहे. वरिष्ठांनी याची दखल घेत उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. तसेच आपल्याला आलेल्या आदेशाप्रमाणे आपण प्राथमिक चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केल्याचे पंचायत समिती, खेडचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी सांगितले.