राजापूर : तालुक्यातील राजापूर-तारळ मुख्य रस्ता ते प्रिंदावण रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. प्रसंगी सुमारे ५ किलाेमीटर अंतर वळसा घालून राजापूर शहराकडे जावे लागत आहे. या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने वाहन चालविणे कठीण झाले आहे.
हजारो नागरिकांचे लसीकरण
राजापूर : तालुक्यात १० जुलैअखेर एकूण ३९,६४३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. तालुक्यासाठी ज्या प्रमाणात लस उपलब्ध होत आहे त्या प्रमाणात नियोजन करुन लसीकरण केले जात आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निखिल परांजपे यांनी दिली.
अनेक कर्जदार खूश
चिपळूण : येथील सावकाराविरोधात सध्या तक्रारींचा ओघ सुरु आहे. त्यामुळे आपली तक्रार होऊ नये म्हणून काही सावकार सावध पवित्रा घेत आहेत. त्यांनी जप्त केलेल्या दुचाकीसह अन्य वस्तू पैसे न घेताच परत करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक कर्जदार खुश झाले आहेत.
रस्ते झाले चिखलमय
रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे रविवारी शहरातील सर्व रस्ते चिखलमय झाले होते. अनेक भागामध्ये चिखलातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. पाईपलाईनसाठी खोदलेल्या चरामध्ये भर पावसात माती टाकून त्यावर रोलर फिरविण्याचे काम शहरातील माळनाका परिसरात सुरु आहे.
सेतू बंद असल्याने लोकांना भुर्दंड
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कमी-जास्त होत असला तरी शासनाच्या सेतू कार्यालयाचे दरवाजे मात्र अजूनही बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना अन्य मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. शासनाकडून जे काम वेगाने आणि अल्प किमतीत होते त्याला मात्र पैसा, वेळ जास्त जात आहे.