प्रकाश वराडकर रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हजर झालेले भूलतज्ज्ञ डॉ. रामचंद्र लवटे हे अवघ्या ८ दिवसांनंतर उच्च शिक्षणासाठी पुण्याला गेले. प्रतिनियुक्तीवर जिल्हा रुग्णालयात हजर होण्याचा आदेश निघालेले वाटद आरोग्य केंद्रातील भूलतज्ज्ञ केशव गुट्टे यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाची ‘भूल’ तज्ज्ञांअभावी कायम आहे. ही भूल उतरणार कधी, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हावासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उभारलेले जिल्हा रुग्णालय, उपरुग्णालये, ग्रामीण रुग्णालये यांचेच आरोग्य धोक्यात आल्याने सर्वसामान्यांची फरपट सुरू आहे. जिल्हा रुग्णालयाला भूलतज्ज्ञ मिळण्यासाठी आमदार राजन साळवी व अन्य नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले होते. आमदार साळवी यांनी जिल्हा रुग्णालयात ठिय्या आंदोलनही केले. त्यानंतर राज्य सरकारने दापोली येथे कार्यरत असलेले भूलतज्ज्ञ डॉ. रामचंद्र लवटे यांची जिल्हा रुग्णालयात बदली केली. डॉ. लवटे हे २४ एप्रिल २०१७ ला जिल्हा रुग्णालयात हजर होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. त्यानंतर १ मे २०१७ रोजी ते जिल्हा रुग्णालयात हजर झाले. आठवडाभर काम करून नंतर त्यांनी ३१ मे पर्यंत सुटी घेतली. त्यानंतर त्यांनी शासकीय सेवेला रामराम करीत उच्च शिक्षणासाठी पुण्यात जाणे पसंत केले. त्यामुळे भूलतज्ज्ञाचा विषय जैसे थे आहे. शासकीय सेवेत रत्नागिरी तालुक्यातील वाटद आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले डॉ. केशव गुट्टे यांची शासनाने जिल्हा रुग्णालयात प्रतिनियुक्ती केली. परंतु डॉ. गुट्टेही हजर झाले नाहीत. त्यांची खात्यामार्फत बदली झाल्याने त्यांनी जिल्ह्याबाहेरची वाट धरली. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला भूलतज्ज्ञ काही मिळाला नाही. जिल्ह्याचे शासकीय रुग्णालय असल्याने येथे प्रसुतीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. अन्य शस्त्रक्रियांचे प्रमाणही मोठे असल्याने येथे भूलतज्ज्ञ असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करूनही त्यांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे भूलतज्ज्ञाअभावी जिल्हा रुग्णालयाची भूल अजूनही उतरलेली नाही. आजही या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी खासगी भूलतज्ज्ञांची सेवा घेतली जात आहे. ही समस्या नक्की कधी सुटणार असा सवाल आता नागरिकांमधून केला जात आहे. एकिकडे भूलतज्ज्ञांची समस्या असताना दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात हृदयरोगतज्ज्ञही उपलब्ध नाहीत. या जागा रिक्तच आहेत. डॉ. खलाटे यांनी शासकीय सेवेतून अंग काढून घेतल्यानंतर ही जागा रिक्त असून, सर्व सुविधांनी युक्त अशा जिल्हा रुग्णालयात विशेष आजारांसाठीचे वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी वैद्यकीय सुविधांसाठी नाहक अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. जिल्हा रुग्णालयात दररोज १० ते १५ प्रसुती शस्त्रक्रिया होतात. त्यासाठी भूलतज्ज्ञ अत्यावश्यक आहेच. त्याशिवाय प्रसुतीतज्ज्ञ डॉक्टर्सही पुरेशा संख्येत असणे आवश्यक आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत प्रसुती रुग्ण विभागात ३ डॉक्टर्स होते. आता केवळ एका महिला डॉक्टरच्या खांद्यावर या विभागाचा डोलारा आहे. लोकप्रतिनिधी या मुद्द्यावर आता मूग गिळून गप्प का आहेत, असा सवाल केला जात आहे.
जिल्हा रुग्णालयाची भूल अद्याप कायम...
By admin | Published: June 19, 2017 12:41 AM