रत्नागिरी : किरकोळ कारणावरून मित्रानेच आपला जीवलग मित्र संतोष शशिकांत सावंत (वय ३८, रा. अलावा) याच्या डोक्यात दांडक्याने जोरदार प्रहार करून निर्घृण खून केल्याची घटना अलावा येथे घडली. याप्रकरणी रमाकांत रघुनाथ सांवत (४०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. संतोष सावंत व संशयित आरोपी रमाकांत सावंत हे दहा वर्षांपूर्वी भारती शिपयार्ड या कंपनीत एकत्र काम करीत होते. त्यामुळे ते एकमेकांचे जीवलग मित्र बनले होते. नेहमीच त्यांच्यामध्ये चेष्टामस्करी चालत असे. गेल्या पाच वर्षांपासून हे दोघेही बेरोजगार होते. छोटी-मोठी कामे करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. दैनंदिन काम आटोपले की, सायंकाळी अलावा येथे गप्पा मारत बसायचे. संतोष नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अलावा येथे गेला. नेहमी तेथे अनेकजण एकत्र जमतात; परंतु बुधवारी संतोष सावंत व रमाकांत सावंत हे दोघेच होते. त्यांच्यात चेष्टामस्करी सुरू झाली. एरवी सगळे विषय चेष्टेवारी नेणाऱ्या रमाकांतला यावेळी मात्र चेष्टा रुचली नाही. रागाच्या भरात त्याने तिथेच पडलेल्या एका दांडक्याने संतोषच्या डोक्यात प्रहार केला. त्यामुळे गंभीर दुखापत होऊन संतोष खाली पडला. त्याची माहिती संतोषच्या घरच्यांना समजली. त्यांनी लगेचच त्याला खासगी रुग्णालयात नेले. गुरुवारी सकाळपर्यंत प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले; परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. संतोष सावंत याच्या नातेवाइकांनी तत्काळ शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रमाकांत सावंत याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. (वार्ताहर) ४हे दोघेही मित्र बुधवारी मद्यपानासाठी एकत्र बसले होते. ४ते एकमेकांचे जीवलग मित्र बनले होते. ४रागाच्या भरात त्याने तिथेच पडलेल्या एका दांडक्याने डोक्यात जोरदार प्रहार केला. ४त्यात वादावादी झाल्यामुळे हा खुनाचा प्रकार घडल्याची चर्चा अलावा परिसरात सुरू आहे.
बाचाबाचीतून मित्राचा दांडक्याने खून
By admin | Published: November 03, 2016 11:24 PM