अडरे : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवल्याने राज्यात शिवसेनेत फूट पडली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेतचे आमदार 'नॉट रिचेबल असतानाच आमदार भास्कर जाधव मात्र मतदारसंघात कार्यरत आहेत. पक्षाचे काम करत त्यांनी पक्षासोबतच असल्याचे दाखवून दिले आहे.भास्कर जाधव यांनी मंगळवारी आपल्या गुहागर मतदारसंघात येणाऱ्या गावातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवादही साधला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत एकदिलाने सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.चिपळूण शहरातील काविळतळी बांदल हायस्कूलच्या सभागृहात चिपळूण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख संदीप सावंत, तालुका संपर्क संघटक अशोक नलावडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळ जाधव, युवा सेनेचे तालुकाधिकारी उमेश खताते, तालुका महिला संघटक सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा खांडेकर, पूनम चव्हाण, प्रज्ञा धनावडे, पंचायत समिती सदस्या अनुजा चव्हाण, माजी उपसभापती शरद शिगवण उपस्थित होते. सुभाष कदम यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले.शिवसेनेचा भगवा फडकवूयाभास्कर जाधव म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने अहोरात्र काम करून महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढले. केंद्र सरकारने मदत दिली नाहीच उलट टीकाटिप्पणी केली, अडचणी आणल्या. भाजपने सरकार पाडण्यासाठी वारंवार प्रयत्न केले हे दुर्दैव आहे. आता आपण सर्वांनी एकजीव होऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करून आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवूया, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.शिवसैनिक हे मानाचे पदजिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी सांगितले की, ज्या पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या कामाला पुरेसा वेळ देता येत नाही, ज्यांच्या काही अडचणी असतील तर सांगा व काम होणार नसेल तर स्वतःहून बाजूला व्हा. मात्र, सामान्य शिवसैनिक म्हणून कार्यरत राहा. पदे येतात व जातात. पण शिवसैनिक हे मानाचे पद कायम राहते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मालदोली, उमरोली, वहाळ, निवळी व कोकरे गटातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
सरकार स्थिर राहील : भास्कर जाधवबैठक संपल्यानंतर आमदार भास्कर जाधव मुंबईला गेले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. राज्यातील सत्तासंघर्षाबाबत बोलणे त्यांनी टाळले पण हे सरकार स्थिर राहील, असे आमदार जाधव यांनी सांगितले.