लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : नाशिकमधल्या महाविकास आघाडीमधल्या नेत्यांमधील वाद प्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री छगन भुजबळ यांची पाठराखण केली आहे. आघाडीच्या एकतेच्या दृष्टीने आमदार सुहास कांदे यांचे थेट वक्तव्य योग्य नाही, असेही त्यांनी येथे स्पष्ट केले.
शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. छगन भुजबळांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा खळबळजनक आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. याबाबत बोलताना खासदार तटकरे म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ हे प्रदीर्घ अनुभवी असे नेते आहेत. भुजबळ हे अनुभवी नेते असल्यामुळे त्यांच्याकडून कुठलाही अन्याय होणार नाही. नाशिकचे शिवसेनेचे आमदार सुभाष कांदे यांचे नेमके काय प्रकरण आहे, या संदर्भात आपल्याला कुठलीही माहिती नाही, असे तटकरे म्हणाले.
तीन पक्षांचे सरकार जेव्हा राज्यांमध्ये अनेक प्रयत्नांनंतर स्थापन झाले. थोड्याफार प्रमाणात कुरबुरी या आघाडीमध्ये होऊ शकतात. त्यामुळे या प्रश्नावर कांदे यांनी थेट वक्तव्य करणे हे आघाडीच्या एकतेच्या दृष्टीने योग्य राहणार नाही, असे खासदार तटकरे यावेळी म्हणाले. तसेच राज्य पातळीवरच्या समन्वय समितीमध्ये या संदर्भातील चर्चा नक्की होऊ शकते. कांदे यांनी न्यायालयात थेट धाव घेतली असेल, तर ते आघाडीच्या दृष्टीने योग्य आहे असे मला वाटत नाही. प्रश्न असू शकतात, चर्चा कराव्या लागतील. त्यामुळे एकत्र बसून आघाडीच्या माध्यमातून यातून मार्ग काढला पाहिजे, असे तटकरे यावेळी म्हणाले.