रत्नागिरी : कुडाळ - मालवणचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना मालमत्तेच्या अनुषंगाने रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र आमदार नाईक यांनी माहिती सादर करण्यासाठी मुदत मागितली असून, ते बुधवारी चौकशीसाठी हजर राहिले नसल्याची माहिती अँटी करप्शन ब्युरोचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत चव्हाण यांनी दिली.आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयच्या रत्नागिरी विभागाकडून चौकशी सुरु आहे. गेल्या शनिवारी कणकवली शासकीय विश्रामगृहावर त्यांची सुशांत चव्हाण यांनी प्राथमिक चौकशी झाली होती. मात्र त्यानंतर त्यांना लेखी नोटीस बजावण्यात आली होती.आमदार नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मालमत्तेच्या अनुषंगाने चौकशी सुरु करण्यात आली आहे. उघड चौकशीच्या अनुषंगाने दिनांक ०१/०१/२००२ ते २९/०९/२०२२ या कालावधीतील आमदार नाईक यांचे उत्पन्न, खर्च व मालमत्ता याबाबतची तपासणी होणार आहे. त्यासाठी बुधवार १२ ऑक्टोबर २०२२ रोजी ११ वाजता आमदार नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पोलीस उपअधीक्षकांनी नाचणे रोड, मारुती मंदिर येथील कार्यालयात उपस्थित राहण्याची नोटीस दिली होती.या चौकशीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. बुधवारी या कार्यालयात काय होणार, याकडे अनेकांचे लक्ष होते. मात्र आमदार नाईक चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. माहिती गोळा करण्यासाठी त्यांनी मुदत मागितली असून, तसे पत्र कार्यालयात दिल्याचे सुशांत चव्हाण यांनी सांगितले.
लाचलुचपतच्या चौकशीला आमदार वैभव नाईक गैरहजर, माहिती सादर करण्यासाठी मागितली मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 2:13 PM