रत्नागिरीः देशातील हुकूमशाही सात-आठ महिन्यांत संपेल, परिस्थिती बदलेल. एक माणूस खोटं बोलून देशाला फसवतो हे आता लोक खपवून घेणार नाहीत, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं. चिपळूणमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या निवडणुकीत भाजपा 100 जागा गमावेल असं भाकितही त्यांनी केलं.
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आज चार वर्षं पूर्ण होत आहेत. साफ नीयत-सही विकास हा नवा नारा देत मोदी सरकार आणि भाजपा हा वर्षपूर्ती सोहळा साजरा करतंय. तर, विरोधक हा दिवस 'विश्वासघात दिन' पाळणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मोदींवर, केंद्र सरकारच्या धोरणांवर हल्ला चढवणाऱ्या राज ठाकरेंना या संदर्भात प्रश्न विचारला असता, त्यांनी मोदींना हुकूमशहाच ठरवलं. देशातील हुकूमशाही सात-आठ महिन्यांत संपेल, असा दावा त्यांनी केला.
आता येणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप सर्वप्रकारची ताकद वापरेल, दंगे घडवेल पण जनता त्यांना बधणार नाही. यासाठी देशातील सर्व विरोधक आता एकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. विरोधकांची आघाडी होणे गरजेचे आहे. आम्ही आघाडीत असू की नाही याचा निर्णय अजून झालेला नाही, असेही ते म्हणाले. या भाजपाविरोधी एकीचा पहिला गिअर आपणच गुढीपाडव्याच्या सभेत टाकला होता, असं राज यांनी काल म्हटलं होतं. त्यानंतर, आज त्यांनी पुन्हा मोदींना लक्ष्य केलं आहे.