शिवसेनेमध्ये बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी मोजक्याच आमदारांना घेऊन सूरत गाठले होते. त्यानंतर गुवाहाटीला आणि शेवटी गोवा असा मुक्काम राज्यातील बंडखोर आमदारांनी केला. गोव्यावरुन महाराष्ट्रात येत भाजपासोबत या सर्व बंडखोर आमदारांनी सत्ता स्थापन केली. अत्यंत गुप्तपणे ही मोहिम राबवण्यात आली.
राज्यात घडलेल्या राजकीय घटनेचा संदर्भ घेत मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी आगामी नवरात्रौत्सवमध्ये रास दांडीया स्पर्धा आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या रास दांडीया स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या व्यक्तीस गुवाहाटीत २ दिवस,३ दिवास राहण्याची संधी मिळणार आहे. तर द्वितीय क्रमांक पटकवणाऱ्याला सूरत येथे २ रात्र,३ दिवस, तृतीय क्रमांक पटकवणाऱ्यास गोव्यात २ रात्र,३ दिवस राहण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेत इतर ५० खोके बक्षिसे देण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेबाबत बोलताना वैभव खेडेकर म्हणाले की, यंदाही खेडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अंबाभवानी मातेची प्रतिस्थापना होणार आहे. यावेळी दरवर्षीप्रमाणे मनसेने नवरात्रीत दहा दिवास रास दांडीया स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावर्षी या स्पर्धेत अभिनव बक्षिसे ठेवण्याचा मानस माझ्या कार्यकर्त्यानं व्यक्त केला. त्यामुळे विजयी होणाऱ्यांना आम्ही गुवाहाटी, सुरत आणि गोव्यात राहण्याची संधी मिळणार असल्याचं वैभव खेडेकरांनी सांगितलं. मनसेच्या या रास दांडीय स्पर्धेची चर्चा मात्र आता राज्यभर रंगली आहे.