खेड : खेड नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय भूकंप होणार, अशी चर्चा सध्या जोरात सुरु झाली आहे. मनसे आणि राष्ट्रवादी युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नव्या युतीची सत्ता आल्यास सत्तेत चांगला वाटा देऊ. मात्र, नगराध्यक्षा म्हणून मला निवडून द्या. मला हा प्रभाग द्या. तुम्ही तो प्रभाग घ्या, एकमेकांचा प्रचार करू, अशी विविध प्रकारची आमिषे दाखवत खेडमध्ये मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. राग, रुसवा असलाच, तर तो निवडणुकीत बाजूला ठेवू, पण शिवसेनेला सत्तेत येऊ द्यायचे नाही, असा चंग राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम आणि मनसे वैभव खेडेकर यांनी बांधला आहे. याबाबत अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेला शह देण्याचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो, याची चर्चा आता खेडमध्ये रंगात आली आहे. राष्ट्रवादीचे खेड, दापोली व मंडणगड आमदार संजय कदम यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. विधानसभा निवडणुकीसह मंडणगड नगरपंचायतीमध्ये आपण जो करिष्मा दाखवला, त्यापेक्षा चांगले यश खेड पालिका निवडणुकीत मिळवण्याचा त्यांचा मनोदय आहे. याकरिता थेट राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह न वापरता राष्ट्रवादी पुरस्कृत शहर विकास आघाडी या चिन्हावर ही निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. शिवसेनेला पर्यायाने रामदास कदमांना शह द्यायचा झाल्यास मनसेची साथ घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याबाबत मनसेचे वैभव खेडेकर यांच्याशी चर्चा झाली असून, शहर विकास आघाडीसोबत घरोबा करण्यावर मतैक्य झाल्याचे रविवारी खेडमध्ये उघड उघड बोलले जात होते. या युतीचे नगराध्यक्ष म्हणून वैभव खेडेकर यांना पसंती देण्यात आली असून, उर्वरित सत्तेत सदर विकास आघाडीला मानाचे पान देण्याचा निर्णय झाल्याचे समजते. मनसे आणि शहर विकास आघाडी एकत्र आल्यास त्याचा थेट परिणाम शिवसेनेवर होणार आहे. याबाबत मुंबईत रामदास कदम यांच्याशी शनिवारी पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे. मनसे आणि शहर विकास आघाडीमध्ये युती झाल्यास व्यूहरचना कशी करायची, याबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी रामदास कदम येत्या दोन दिवसात खेडला येत आहेत. यावेळी युवा सेना, विद्यार्थी सेना तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी एकत्र बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आमदार संजय कदम आणि वैभव खेडेकर यांना रोखण्यासाठी व्यूहरचना आखली जाईल. (प्रतिनिधी)
मनसेची राष्ट्रवादीशी युती?
By admin | Published: October 24, 2016 12:12 AM