रत्नागिरी : वाढीव वीजबिल माफ करण्यासाठी गुरूवारी मनसेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शासनाने वीजबिल माफीबाबत निर्णय न घेतल्यास उग्र आंदोलन करण्याचा निर्धार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी आघाडी सरकाराचा निषेधही करण्यात आला.रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम शेतकरी,मजुर तसेच छोटे मोठे व्यवसायिक यांना टाळेबंदी काळातील वीज बिल माफी मिळाली पाहिजे या प्रमुख मागणी करीता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनेक यशस्वी आंदोलने झाली आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाची दखल घेत राज ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर येथून या मोर्चाला सुरूवात करण्यात आली. तेथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला.वीजवितरण कंपनीने दिलेल्या चुकीच्या वाढीव बिलाबद्दल सर्व रत्नागिरीकरांनी एकजुट होऊन वीज बिल माफी करीता संघर्ष करुया, हीच वेळ आहे अन्यायाविरोधात लढण्याची, आपला हक्क मागण्याची, जनशक्तीची ताकद दाखवण्याची त्यासाठी आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे.आपण सर्वांनी पक्ष भेद विसरुन शासनाला जागृत करुया, असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.त्यानंतर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, अनिरुद्ध (छोटू) खामकर, राज परमार, नयन पाटील, रूपेश सावंत यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते.