कणकवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढविण्यात येणार आहेत. काँग्रेस आघाडी शासनाने कोकणची केलेली फसवणूक तसेच विकासाचा मुद्दा घेऊन ही निवडणूक लढविण्यात येईल, अशी माहिती मनसेचे कोकण विभाग संघटक माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, शनिवारी मुंबई येथे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक झाली. यावेळी आगामी निवडणुकीसाठी रणनिती आखण्यात आली. सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील विधानसभेच्या सर्व जागा पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातून मनसे आपले उमेदवार देणार आहे. पक्ष निरीक्षकांकडे इच्छुकांची नावे देण्यात आली आहेत. उमेदवार निश्चितीसाठी स्वत: राज ठाकरे संबंधितांची मुलाखत घेतील, असेही त्यांनी सांगितले.उपरकर पुढे म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी आघाडी शासनाने जाहीर केलेले कोकण पॅकेज हे फसवे होते. पालकमंत्री तसेच सावंतवाडीच्या आमदारांनी या पॅकेजबाबत मोठा गवगवा केला होता. मात्र, जनतेची फसवणूकच झाली आहे. जिल्ह्यातील प्रथम कॅबिनेट मंत्री होण्याचा मान मिळालेले भाई सावंत यांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र पालकमंत्री नारायण राणे तसेच आमदार दीपक केसरकर हे आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. तीव्र इच्छाशक्ती नसल्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांकडे या स्मारकासाठी अद्याप कोणताही प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. (वार्ताहर)
मनसे कोकणातील सर्व जागा लढणार : उपरकर
By admin | Published: September 09, 2014 11:41 PM