रत्नागिरी : रत्नागिरी - चिपळूण बस घेऊन जात असताना चालक संतोष मच्छिंद्र्र बडे मोबाईलवर संभाषण करत असल्याचा व्हिडिओ प्रवाशांनी मोबाईलवर तयार केला होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरला झाला होता. याची दखल घेऊन चिपळूण वाहतूक निरीक्षक अनिल पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार अखेर राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे चालक बडे याचे निलंबन करण्यात आले आहे.रत्नागिरी - चिपळूण ही गाडी रविवार, २९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकातून सुटली. ही बस घेऊन चालक संतोष बडे (बिल्ला क्रमांक २२८९५) जात होते. हातखंबानजीक त्यांच्या मोबाईलवर रिंग आल्याने गाडी चालवतच ते मोबाईलवर बोलत होते. बराच वेळ ते मोबाईलवर बोलत असल्याचे लक्षात येताच गाडीतील प्रवाशांनी चालक बस चालवताना दोन ते तीन मिनिटे मोबाईलवर संभाषण करत असल्याची व्हिडीओ क्लीप तयार केली.चिपळूण आगाराचे वाहतूक निरीक्षक अनिल शामराव पाटील यांनी याबाबतचा अहवाल राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाकडे सादर केला. यापूर्वी वारंवार चालकांना बस चालविताना मोबाईलचा वापर न करणेबाबत सूचना करण्यात आल्या होत्या.
शिवाय यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके यांची पूर्वकल्पना देण्यात आली होती. मात्र तोंडी आदेश देऊनही चालक संतोष मच्छिंद्र् बडे यांनी कर्तव्यावर असताना मोबाईलचा वापर करून प्रशासकीय आदेशांचा भंग केल्याचे अहवालात नमूद केले आहे. शिवाय प्रवाशांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. संबंधित चालक बडे यांच्यावर कारवाई व्हावी, म्हटले आहे. या अहवालाची दखल घेत ही कारवाई करण्यात आली.