चिपळूण : शहरानजीकच्या खेर्डी येथील एका महिला डॉक्टरच्या घरातून एक वर्षापूर्वी चोरीला गेलेला मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. चाेरट्याने माेबाईलमध्ये सीमकार्ड टाकून सुरू केल्याने ताे पाेलिसांच्या तावडीत सापडला. याबाबत खेर्डीतील डॉ. समीक्षा मधुकर भुरण यांनी तक्रार दिली होती.
ही माेबाईल चाेरीची घटना १२ मे २०२० रोजी रात्री घडली हाेती. राजकुमार शंकरलाल पटेल (३०, रा. सध्या खेर्डी, मूळ मध्यप्रदेश) याने बाल्कनीतून प्रवेश करून बेडरूममधील खिडकीतून डॉ. भुरण यांचा मोबाईल चोरून नेला होता. पटेल हा खेर्डी एमआयडीसीत एका कंपनीत नोकरी करतो. वर्षभरानंतर त्याने मोबाईलमध्ये नवीन सीमकार्ड टाकून तो सुरू केला. तो मोबाईल वापरत असताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी त्याला शनिवारी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश शिंदे करत आहेत.