लांजा :
जावडे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण ड्युटीवर असलेल्या आरोग्यसेविका हिचे दुर्लक्ष होताच कोरोना लस घेण्यासाठी आलेल्या गवाणे येथील २९ वर्षीय तरुणाने माेबाईल चाेरल्याचा प्रकार घडला हाेता़ उपविभागीय आयकाॅन युनिट यांनी तपास करून त्याला जेरबंद केले. अनिकेत गोपीनाथ गुरव याला अटक करण्यात आली़ त्याच्याकडून माेबाईलही हस्तगत करण्यात आला़
वैष्णवी विक्रांत कोत्रे (रा. कोत्रेवाडी, लांजा) या जावडे प्राथमिक आरोग्य केंद्रात लॅब टेक्निशियन म्हणून काम करतात़ दि. २६ एप्रिल रोजी कोरोना लसीकरणाची त्यांना ड्युटी होती. त्यांनी १२ हजार रुपये किमतीचा विवो वाय ५१ हा मोबाईल हाॅलमध्ये टेबलावर ठेवला हाेता़ ताे चोरट्याने सकाळी ९.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास चोरुन नेला हाेता. याप्रकरणी दि. २७ एप्रिल रोजी फिर्याद दाखल केली होती.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना उपविभागीय पोलीस अधिकारी निवास सोळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा उपविभागीय आयकॉन युनिटमधील पोलीस अंमलदार सुनील पडळकर यांनी तपास सुरू केला़ त्यावेळी गवाणे गुरववाडी येथे राहणारा अनिकेत गोपीनाथ गुरव याने हा मोबाईल चोरल्याचे निष्पन्न झाले़ त्याची अधिक चौकशी केली असता मोबाईल चोरल्याचे कबूल केले. अनिकेत गुरव याला लांजा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस काेठडी सुनावली आहे.
पोलीस अमलदार सुनील पडळकर, सुयोग वाडकर, अविनाश भोसले, जगताप तसेच लांजा पोलीस स्थानकाचे पोलीस हवालदार शांताराम पंदेरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील चवेकर, पोलीस नाईक दिनेश आखाडे यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यास मदत केली. अधिक तपास सुनील चवेकर हे करीत आहेत.