रत्नागिरी : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी उद्योजक, सामाजिक संस्थांना आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरी एमआयडीसी येथील एम. के. उद्योग समुहाचे संचालक आणि उद्योजक अनुप सुर्वे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. रत्नागिरीतील सुमा कंपनीच्या जागेत काेविड केअर सेंटर उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. लवकरच रत्नागिरीत आधुनिक काेविड सेंटर उभारण्यात येणार आहे.
अनुप सुर्वे यांच्यामार्फत उभारण्यात येणाऱ्या कोविड केअर सेंटरमध्ये ६० ते ७० बेडची सुविधा असणार आहे. या सेंटरचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये डेडिकेटेड कोविड केअर सेंटर म्हणूनही सुविधा मिळणार आहे. ज्यात आवश्यकतेनुसार ऑक्सिजन बेड्स आणि अन्य आवश्यक सुविधा असणार आहेत.
अनुप सुर्वे यांचे रत्नागिरी, ठाणे, नवी मुंबई येथे उद्योग आहेत. पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी अनुप सुर्वे यांचे कौतुक करत अन्य उद्योजकांनीही अशा प्रकारचे सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. हे कोविड केअर सेंटर प्रत्यक्षात येण्यासाठी जाणीव फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस प्रशासन आणि उद्योजक यांच्याशी सुसंवाद साधून हे कोविड केअर सेंटर प्रत्यक्षात येण्यासाठी मेहनत घेतली आहे. तसेच त्याबाबत आवश्यक गोष्टींची पूर्तता केली. महेश गर्दे यांनी यासोबतच कोरोना योध्द्यांची भूमिका चोख बजावत शासकीय कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवा करीत आहेत. या सेंटरमुळे पोलीस प्रशासन अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य यंत्रणेमध्ये सामाजिक काम करणाऱ्या व्यक्ती यासंबंधीत येणाऱ्या रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.